Bookstruck

खरा मित्र 8

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

राजपुत्राला राग आला. आनंदाचा व उत्सवाचा सर्व विरस होणार याचे याला वाईट वाटले, परंतु उपकाराच्या ओझ्याखाली तो दबला होता. शेवटी दरवाजा पाडण्यात आला व मिरवणूक शहरात गेली.

राजाने मोठी थाटाची पंगत देण्याचे ठरविले. रात्री आठ वाजता पंगत होती. मोठा मंडप घातला होता. किनखापाने श्रृंगारला होता. तेथील थाट काय सांगावा? पंगतीची तयारी झाली. खाशा स्वार्‍या तयार झाल्या. राजपुत्र पहिल्या पानावर बसला. त्याच्याजवळ त्याच्या मित्राचे पान होते. मंडळी आता जेवावयास आरंभ करणार, इतक्यात प्रधानाच्या मुलाने राजपुत्राच्या ताटातील उत्कृष्ट जातीचा तो मासा उचलून घेतला. भर पंक्तीत अपमान! राजपुत्र रागाने लाल झाला. परंतु करतो काय?

जेवण झाली. राजपुत्र आपल्या मित्रास म्हणाला, 'तू चालता हो. तुझे मला दर्शन नको. आज सकाळपासून मी पाहातो आहे. किती अपमान सहन करावे? काही मर्यादा आहे की नाही सहनशीलतेची? अत:पर हे मला सहन होत नाही. माझा पदोपदी पाणउतारा आणि सर्वांसमक्ष! जा, पुन्हा तोंड दाखवू नकोस,' असे म्हणून राजपुत्र तणतणत निघून गेला.

प्रधानपुत्र रागावला नाही. प्रेम सर्व अपमान पोटात गिळते. निंदा, अपमान, तिरस्कार सहन करुन जे टिकेल तेच खरे प्रेम. प्रधानपुत्र मनात म्हणाला, 'अजून एक वेळ माझी जरुरी आहे. मग मी चालता होईन' तो राजपुत्राच्या झोपण्याच्या खोलीत आधीच लपून बसला. दमला भागलेला राजपुत्र झोपी गेला. पलंगाखालून बाहेर येऊन प्रधानपुत्र नागवी तलवार घेऊन उभा होता. एकाएकी एक नाग आला व पलंगावर चढू लागला. प्रधानपुत्राने एका वारानेच त्याची खांडोळी केली. घाव इतका जोराचा बसला की रक्ताची चिळकांडी उडाली. राजपुत्राचा हात पांघरुणाच्या बाहेर होता. ता उघडया हातावर रक्त उडाले. प्रधानपुत्राच्या मनात आले की ते हळुच पुसावे. त्याने हलक्या हाताने ते रक्त पुसले, परंतु राजपुत्र जागा झाला.

'काय, अजून तू इथेच? आणि हातात तलवार? माझा खून करावयास आलास? मारेकर्‍या दुष्टा -'राजपुत्र संतापाने वेडा झाला.

प्रधानपुत्र म्हणाला, 'महाराज, तुमचे प्राण वाचवण्यासाठी हा दास येथे लपला होता. आज सर्प येऊन तुम्हास दंश करणार हे मला कळले होते, म्हणून मी येथे आलो. हा पाहा सर्प मरून पडला आहे.'

राजपुत्राने सर्प पाहिला. 'मला मारावयास आलेला तू, तुला दुष्टालाच दंश करावयासाठी हा सर्प येत होता. मला दंश करावयास का येईल? वाहवा रे मित्र! मित्राला मारणारा मित्र!' राजपुत्र तिरस्कार, उपहास व संताप याने बोलत होता.

प्रधानपुत्र म्हणाला, 'मी जे आज सकाळपासून वर्तन केले, ते तुमचे प्राण वाचवण्यासाठी. मला सर्व हकीगत तुम्हास सांगता येत नाही. कारण ती जर मी सांगेन, तर मी दगड होऊन पडेन.

राजपुत्र म्हणाला, 'थोतांड! शु़ध्द ढोंग. सारी लफंगेगिरी. म्हणे दगड होऊन पडेल! सांग, सारी हकीगत सांग. झालास दगड तर झालास. सांग.'


 

« PreviousChapter ListNext »