Bookstruck

सोने परत आले 6

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

“मी करीन. मनूबाबा, ती मुलगी मजजवळ द्या. आमच्या घरी तोटा नाही. दाई ठेवीन, गडीमाणसं तिला खेळवतील, आंदुळतील, द्या ती मुलगी. कशी आहे सोन्यासारखी!” संपतराय म्हणाला.

“नाही. मी कोणाला देणार नाही. हे माझं सानं आहे. हे माझ्याकडे आलं आहे. ह्या मुलीचं आता सारं मी करीन. मी करीन.”

असे म्हणून मनूबाबाने तिला घट्ट धरून ठेवले. तिनेही विश्वासाने त्याच्या गळ्याला मिठी मारली. त्याने तिचे मुके घेतले.

“मनूबाबा, तुमच्या घरात दुसरं कोणी नाही. कसं कराल त्या मुलीचं!” कोणी विचारले.

“दुसरं कोणी नाही म्हणूनच मला करता येईल. सारं लक्ष तिच्याकडे देता येईल. मला दुसरा व्याप नाही, दुसरे धंदे नाहीत. मी या मुलीची आई होईन, बाप होईन. मी तिचं सारं करीन.” मनूबाबा म्हणाला.

“हे निदान दहा रुपये तरी घ्या. तिला गरम कपडे करा. अंथरूण पांघरूण करा. कधी लागलं तर मजजवळ मागा. मनूबाबा, तुम्ही ही मुलगी वाढवणार? आश्चर्य आहे. परंतु वाढवा. ती तुमच्या झोपडीत आली. जणू तुमची झाली.” संपतराय म्हणाला.

“या स्त्रीची क्रिया करायला हवी.” कोणी तरी म्हणाले.

“क्रियेसाठी मी पैसे देतो. तुम्ही सारं तिचं करा. हे घ्या पैसे. लागतील तेवढे खर्च करा.” संपतराय पैसे देत म्हणाला.

“किती थोर तुमचं मन. श्रीमंतांची मनंही जर अशी श्रीमंत असतील तर जगात दु:ख दिसणार नाही.” साळूबाई म्हणाली.

त्या मातेच्या देहाला अग्नी देण्यात आला. मनूबाबा ती मुलगी घेऊन झोपडीत बसला होता. ‘माझं सोनं परत आलं, हसत हसत परत आलं, सजीव होऊन, साकार होऊन परत आलं’ असे तो म्हणत होता. त्या मुलीचे पटापट मुके तो घेत होता व ती मा मा मा मा  करत त्याच्याजवळ हसत खेळत होती.

« PreviousChapter ListNext »