Bookstruck

संपतरायाचे लग्न 3

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

व्यसनात पडू नको. आळशी राहू नको. उद्योगात राहावं, म्हणजे शरीर व मन निरोगी राहातं समजलं ना? मला आता कसलीही इच्छा नाही. तुमचा दोघांचा जोडा पाहून डोळे कृतार्थ झाले. तो ठकसेन कुठं असेल देवाला माहीत. परंतु नको त्याची आठवण. जर कधी काळी आला, आधारासाठी आला तर त्याला जवळ घे. कसाही झाला तरी तो तुझा भाऊ. परंतु जपून वाग.”

पित्याचे शब्द ऐकता ऐकता संपतचे डोळे भरून आले. इतक्यात इंदुमती तिकडून आली. ती सासर्‍याचे पाय चेपीत बसली. सासर्‍याने तिच्याकडे पाहिले. तो म्हणाला, “इंदू, तुझ्या हातात सारं आहे. हा संपत तुझ्या हाती दिला आहे. त्याला सांभाळ. त्याच्या जीवनाला घाण लागू देऊ नकोस. त्याचा दिवाणखाना स्वच्छ केलास. तिथं फुलांचे गुच्छ ठेवलेस. तेथील तसबिरी झाडल्यास. संपतच्या हृदयाचा दिवाणखानाही निर्मल ठेव. तिथं भक्ती, प्रेम, दया, पवित्रता यांचा सुगंध पसर. समजलीस ना? तू थोर मनाची आहेस. आता मला काळजी नाही. संपतची जीवननौका तू नीट वल्हवून नेशील. सुखी राहा. एकमेकांची इच्छा सांभाळा. ओढून धरू नका. आपलाच हेका चालवू नका. एकमेकांविषयी शंका कधी घेऊ नका. संशय मनात वाढू देऊ नये. संशय मनात येताच तो निस्तरून घ्यावा. मोकळेपणा असावा. प्रेम हे मोकळं असतं. प्रेम भीत नाही. शंका आली,-विचारावी. कधी भांडण झालंच तर पुन्हा विसरा. पुन्हा हसा. जो आधी भांडण विसरून हसेल तो खरा. हसतेस काय इंदू? तुला सारं समजतंच आहे. पण मला राहावत नाही म्हणून सांगतो.”

दिगंबररायांनी पुत्राचे व सुनेचे हात आपल्या हातांत एकत्र घेतले. नंतर त्यांनी त्यांच्या डोक्यांवर आपला मंगल हात ठेवून त्यांना आशीर्वाद दिला. संपत व इंदू- दोघांचे डोळे भरून आले होते. दोघांचे का तिघांचे डोळे भरून आले. तिघांची हृदये भरून आली, आणि दिगंबररायांची घटकाही भरत आली.

एके दिवशी दिगंबरराय देवाकडे गेले! सार्‍या गावाला वाईट वाटले. अनेक स्नेही-सखे, आप्त-इष्ट समाचारासाठी आले. हळूहळू दु:ख कमी झाले. संपतराय आता धनी झाला. इंदुमती व तो दोघे सुखाने राहू लागली. वडिलांप्रमाणे नीट कारभार चालवू लागली.

« PreviousChapter ListNext »