Bookstruck

सोनी 7

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

“बाबा, आपल्या घराजवळ एखादी बाग करा ना. लहानशी फुलांची बाग. मात्र त्या बागेत तुम्ही नाही काम करायचं. मी व रामू त्या बागेत खपू. आम्ही खणू, फुलझाडं लावू, पाणी घालू. रामूनं कबूल केलं आहे. कराल का बाग? लहानशी असली तरी पुरे. परंतु कुठ करायची? आपली अशी जागाच नाही. किती तरी जमीन पडली आहे पलीकडे. त्या खळग्याजवळ. आपणाला ती घेता नाही येणार का? येईल का घेता? त्यासाठी ता बरेच पैसे पडतील?” सोनीने मनूबाबाच्या गळ्याला मिठी मारून विचारले.

“घेऊ हो जागा. करू हो बाग. मग सोनीच्या केसात रोज फुलं. रोज गजरे.” मनूबाबा हसून म्हणाला.

“रामूच्या आईच्या देवांनाही होतील, आणि मी गुच्छ करून तुम्ही विणता तेथील खिडकीत ठेवीन. तुम्हांला विणताना छान वास येईल नाही? पण बाबा, एक अट आहे. तुम्ही नाही हो बागेत काम करायचं. तुम्ही दमाल. तुम्ही आम्हांला सांगा बाग कशी करायची ते. रामू व मी दोघंजणं काम करू.” ती म्हणाली.

“काम करता करता भांडू लागाल.” तो हसून म्हणाला.

“आता का आम्ही लहान आहो भांडायला?” तिने हसून विचारले.

“मग तू का मोठी झालीस? अहा रे मोठी सोनी.” मनूबाबा म्हणाले.

“खरचं बाबा. मी काही लहान नाही. आता मी मोठी झाले बाबा.” ती म्हणाली.

आणि खरेच, सोनी आता मोठी होत चालली होती व रामूही मोठा होत चालला होता. एके दिवशी रामू व सोनी दोघेजण बसली होती.

“सोन्ये, तुला मी एक विचारू?” त्याने गंभीरपणे प्रश्न केला.

“विचार ना. माझी परवानगी कशाला?”

“तू रागावशील.”

« PreviousChapter ListNext »