Bookstruck

सत्य लपत नाही 3

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

“काय सांगू? त्या विणकारचं सोनं पंधरा वर्षांपूर्वी चोरीस गेलं होतं, ते माझ्या भावानं चोरलं होतं. पंधरा वर्षांनी सत्य उघडकीस आलं. तुझ्या पतीचा भाऊ चोर निघाला. चोराच्या भावाशी तू लग्न लावलंस. माझ्यामुळं, आमच्यामुळं तुला कमीपणा. तुझं माहेर मोठं, घरंदाज. थोर कुळातील तू. माझ्याकडे आता तू आदराने पाहू शकणार नाहीस. चोराचा भाऊ असं तुझ्या मनात येईल. काय करणार मी?” असे म्हणून संपतराय केविलवाण्या दृष्टीने पलीकडे पाहू लागले. थोडा वेळ कोणी काही बोलले नाही.

नंतर इंदुमती पतीचा हात प्रेमाने आपल्या दोन्ही हातांनी धरून म्हणाली, “तुम्ही वाईट नका वाटून घेऊ. तुमचा भाऊ असा निघाला त्यात तुमचा काय दोष? घराण्याला थोडा कमीपणा येतो; परंतु काय करायचं? मामंजी आज हयात नाहीत हे एका दृष्टीने बरं. नाही तर त्यांच्या जीवाला फार लागली असती ही गोष्ट. मी तुमच्याकडे भक्तीप्रेमानंच पाहीन. मला जगाशी काय करावयाचं आहे? माझं सारं धन म्हणजे तुम्ही. तुम्ही माझं सर्वस्व. तुम्ही निर्मळ व निष्पाप असलेत म्हणजे झालं. का? अशी का करता मुद्रा? काय होतं तुम्हांला? का आले डोळे भरून? नका हो रडू. मनाला इतकं लावून घेऊ नये. बाकी भावाला असा अपघाती मृत्यू यावा याचं वाईट वाटणारच. परंतु आपला काय इलाज?”

थोडा वेळ कोणी बोलले नाही.

संपतराय गंभीरपणे म्हणाले, “इंदू आणखीही तुला काही सांगणार आहे. सत्य जगात केव्हा ना केव्हा प्रकट होतंच. मग सारं तुला सांगून टाकतो. सांगू?”

“सांगा. काय सांगायचं?” ती भीतभीत विचारती झाली.

“इंदू तुझा पतीही निर्दोष नाही. हा संपतराय निष्पाप नाही. मी तुझ्याबरोबर लग्न करणं लांबणीवर टाकीत होतो. ही गोष्ट तुला आठवत असेल. मी एका मुलीच्या प्रेमपाशात अडकलो होतो. तिच्याजवळ मी गुप्तपणे लग्न लावलं होतं. एका गावात एक घर भाड्यानं घेऊन तेथे तिला ठेविली होती. ती मुलगी गरीब घराण्यातील होती. आम्ही मोठ्या घराण्यातील. बाबांनी त्या मुलीजवळ लग्न लावायला कधीही संमती दिली नसती. मलाही उघडपणे त्या मुलीला माझी पत्नी म्हणून इथं आणण्याचं धार्ष्ट्य झालं नाही. समाजाच्या टीकेला मी भ्यालो. खोटे श्रेष्ठकनिष्ठाचे भेद, त्यांना मी बळी पडलो. मनाने मोठा तो मोठा. तो कोठे का जन्मेना? कोठे रानातही गुलाब फुलला, तरी त्याचा सुगंध दशदिशांना धावणारच. परंतु मी भ्याड होतो. त्या माझ्या पत्नीला माझ्यापासून एक सुंदर मुलगी झाली होती. मी मधून मधून तिच्याकडे जात असे. त्या सुंदर लहान अर्भकाला जवळ घेत असे. माझी पत्नी मला नेहमी विचारी, ‘कधी नेणार घरी?’ मी म्हणे, ‘नेईन लवकर.’ परंतु ती निराश झाली. लहान मूल कडेवर घेऊन ती माझ्याकडे येण्यासाठी निघाली असावी. पायी यायला निघाली.

« PreviousChapter ListNext »