Bookstruck

सोनीचे लग्न 11

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

“सोन्ये, गावात ते वृद्ध धोंडीबा आहेत ना, त्यांनाही नमस्कार करून या. सार्‍या गावात ते अधिक वृद्ध आहेत. त्यांना आनंद होईल.” सखाराम म्हणाला.

वधूवर त्या वृद्ध धोंडीबाकडे गेली. धोंडीबा दारातच होते. सोनी व रामू त्यांच्या पाया पडली. धोंडीबाने त्यांना आशीर्वाद दिला. धोंडीबा म्हणाला, “रामूच्या वडिलांना हे असं होणार म्हणून मी कधीच सांगितलं होतं. म्हातार्‍याचं म्हणणं खोटं होत नसतं. आमचे डोळे अधू होत चालले तरीही आम्हांला दूरचं दिसतं. हसता काय? सुखानं संसार करा. म्हातार्‍यांना मान द्या. त्यांची सेवा करा समजलं ना?”

सोनी व रामू बागेत गेली. दोघे आईच्या त्या पवित्र स्थानी उभी होती. दोघांनी त्या जागेवर भक्तीने फुले वाहिली. दोघांनी प्रणाम केले.

“आई, आम्हा दोघांना आशीर्वाद दे.” दोघे म्हणाली.

“सोनीच्या आई, मलाही क्षमा कर.” संपतराय म्हणाले. ते हळूच पाठीमागे येऊन उभे होते. त्यांनी त्या पवित्र स्थळाला साश्रू प्रणाम केला.

“सोन्ये, रामू, मला परका मानू नका. माझ्या बागेतील फुलं तुमची आहेत, फळं तुमची आहेत. माझ्या घरातील सारं तुमचं आहे. हक्काने मागा, नेत जा. त्यांतच आम्हांला आनंद हो सोन्ये. या पवित्र ठिकाणी मी सांगत आहे.” संपतराय म्हणाले.

“होय बाबा.” सोनी म्हणाली.

संपतराय निघून गेले. सोनी व रामूही हळूहळू निघून गेली.

« PreviousChapter ListNext »