Bookstruck

धक्क्याचा इतिहास

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter List

मुंबई बंदरात तीन डॉक बांधल्या जाण्याच्या अगोदर प्रवाशांसाठी वा मालाच्या बोटीसाठी धक्काच नव्हता! फक्त रॉयल नेव्हीच्या बोटीसाठी नेव्हल डॉकयार्ड होते. इतर प्रवासी वा मालाच्या बोटी समुद्रातच उभ्या राहत असत. मुंबई बंदरात पहिला मोठा धक्का सध्याच्या वाडीबंदरला बांधला गेला. तो बांधण्याचे कांम श्री. भाऊ अजिंक्य यांनी केले. धक्का दगडी, लांबरुंद व प्रशस्त होता व मुंबईतील दगडमाती उचलून नेऊन त्याचेमागे भरणी करून भरपूर जमीन निर्माण केली गेली. या धक्क्याला मग प्रवासी व मालाच्या बोटी लागू लागल्या. मालाची गोडाऊन व शेडस उभ्या राहिल्या. भाऊ अजिंक्य यांनी बांधला म्हणून साहजिकच लोक त्याला भाऊचा धक्का म्हणू लागले. कोकणात जाणाऱ्या बोटी तेव्हा या धक्क्याला लागत.प्रिन्सेस, व्हिक्टोरिया व नंतर अलेक्झांड्रा डॉक बांधल्या गेल्या तेव्हां हा धक्का अलेक्झांड्रा डॉक मध्ये समाविष्ट झाला असावा. (अगदी आतील भिंत). त्यानंतर अलेक्झांड्रा डॉकच्या समुद्राकडल्या अगदी बाहेरच्या भिंतीला कोकणात जाणारया बोटी लागू लागल्या म्हणून त्या धक्क्यालाच मग लोक ‘भाऊचा धक्का’ म्हणू लागले! माझ्या शाळकरी वयात मी अनेकदा या धक्क्यावरून कोकणात गेलो. गिरगावातून व्हिक्टोरिया केली व ‘भाऊचा धक्का’ म्हटले कीं व्हिक्टोरिया प्रिन्सेस डॉक मध्ये शिरून मग आतील रस्त्याने तेथे जात असे. ऑपेरा हाउस पासून बसही याच ‘भाऊच्या धक्क्या’ला जात असे.
या धक्क्यापाशी समुद्राचे पाणी चांगले खोल असे. कोकणात जाणारया छोट्या बोटीसाठी हा धक्का कशाला अडकवावा या हेतूने. मुंबई पोर्ट ट्रस्ट ने सध्या वापरली जाणारी नवीन जेटी व्हिक्टोरिया डॉक च्या उत्तरेला बांधली. अलेक्झांड्रा डॉकची मोकळी झालेली भिंत मालाच्या मोठ्या बोटी लागण्यासाठी वापरली जाऊ लागली. मात्र या नवीन जेटीलाच आता ‘भाऊचा धक्का’ हे नाव वापरले जाऊ लागले! अजूनही तेथे जाणारी बस ‘भाऊचा धक्का’ अशीच पाटी मिरवते.
अशी ही भाऊच्या धक्क्याची कहाणी आहे.

« PreviousChapter List