Bookstruck

कलवान विजय 2

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

एके दिवशी एक बुध्द भिक्षू आला होता. त्या काळी हिंदुस्थानात बुध्द धर्माची चलती होती. कनोज, बिहार वगैरे प्रांत म्हणजे तर बुध्द धर्माची आगरे. त्या भिक्षूचे दर्शन घेण्यासाठी बलदेव गेला होता. वंदन करून बलदेव भत्तिभावाने तेथे बसला.

'बेटा, धर्मासाठी काही करशील की नाही?' भिक्षूने विचारले.

'मी गरीब आहे महाराज. कुटुंब मोठे. पाच मुलगे. एक मुलगी. मी एकटा मिळवता. धर्मासाठी काय करू?'

'धर्मासाठी एक मुलगा दे. पैशापेक्षा धर्माला माणसांची जरूर असते. भगवान बुध्द धर्माचा प्रसार करण्यासाठी सर्वत्र प्रचारक पाठवीत. सम्राट अशोक याने तर त्या काळी माहीत असलेल्या सर्व जगात धर्मप्रचारक पाठविले. सूर्याचे हजारो किरण सर्वत्र जातात व अंधार दूर करतात, त्याप्रमाणे धर्माचा प्रसार करणारे जगाच्या कोनाकोपर्‍यात गेले पाहिजेत. त्यांनी अधर्माचा अंधार दूर केला पाहिजे; परंतु माणसेच नाहीत. तेजस्वी, पराक्रमी, कर्ते असे नवयुवक मिळाले पाहिजेत. तुला पाच मुलगे आहेत. एक धर्माला दे. सर्व कुळाचा तो उध्दार करील. आध्यात्मिक वैभव कुळाला देईल. खरे ना?'

'होय महाराज.'

'तुमच्या शिरसमणी गावात एक मोठे मठ आहे;' परंतु तेथे कोणी शिकायला जात नाही. दुःखाची गोष्ट. तुझ्या एखाद्या मुलाला पाठव. तयार होईल. धर्माची सेवा म्हणजे जगाची सेवा.'

'खरे आहे महाराज. मी एक मुलगा धर्मासाठी देईन.' भिक्षूस प्रणाम करून बलदेव घरी आला. कोणता मुलगा धर्मासाठी द्यावा याचा तो विचार करीत होता. आपला विजय सर्वांत चांगला आहे. उंच आहे. तेजस्वी आहे. दिसतोही सुंदर. जी वस्तू धर्मासाठी द्यायची ती चांगली असावी. विजयपेक्षा अधिक चांगली वस्तू माझ्याजवळ नाही. विजय धर्माला देऊन टाकावा. त्याने मनात ठरविले.

हळुहळू त्याने आपला विचार घरात प्रगट केला. गावातही तो कळला. बलदेवाचा संकल्प ऐकून सर्वांनी प्रशंसा केली; परंतु विजय काही बोलला नाही. मंजुळाही जरा खिन्न झाली.
एके दिवशी जेवताना अशोक म्हणाला, 'आई, मी आता दूर जातो. कोठे दरी उद्योगधंदा करीन. मी आता मोठा झालो. घरी अडचणच असते. मथुरेला जाईन म्हणतो.'

« PreviousChapter ListNext »