Bookstruck

राजधानीत 2

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

'अरे ए. थोबाड फोडायला हवे वाटते?' असे शिपाई म्हणू लागले; परंतु इतक्यात राजाजवळचा एक मोठा अधिकारी दौडत आला व काय आहे म्हणून चौकशी करू लागला. विजयने हकीगत सांगितली.

'घ्या त्याला व त्याच्या बरोबरच्यांना आत. प्रवेशपत्र असूनही तुम्ही लोकांना आत सोडीत नाही हे काय?' असे दरडावून तो अधिकारी गेला.

ती तिघे आत गेली. जमलेल्या हजारो लोकांना आश्चर्य वाटले.

'विजय, तू होतास म्हणून प्रवेश मिळाला.' ती मुलगी म्हणाली.

'चला, आपण प्रदर्शन पाहू.' तो प्रेमाने म्हणाला.

त्या तिघांनी प्रदर्शन पाहिले. म्हातारा न्याहाळून पाहात होता. विजयचे नमुनेही त्यांनी पाहिले. म्हातर्‍याने विजयच्या चित्रांची प्रशंसा केली.

'हा आकाशाचा रंग तुम्हाला किती छान साधला आहे!' तो म्हणाला.

'आणि ही फुलेसुध्द किती सुंदर!' ती मुलगी म्हणाली.

'मला आता भूक लागली आहे. उपाहारगृहात जाऊ या.' विजयने सुचविले.
ती तिघे उपाहारगृहात गेली. तेथे शेकडो प्रकारची फळे होती. शेकडो खाद्यपदार्थ होते. मेवामिठाई होती. पेये होती.

'ही द्राक्षे घ्या. कशी रसाळ आहेत.' ती म्हणाली.

'मी तर खातोच आहे, तुम्ही मात्र फक्त माझ्याकडे पाहात आहात. मला पाहून का भूक शांत होईल?' विजय म्हणाला.

'बाबा, तुम्ही ही मिठाई घ्या.' ती म्हणाली.

इतक्यात विजयला माईजींनी दिलेल्या त्या चिठ्ठीची आठवण झाली. त्याने एका सेवकाबरोबर चिठ्ठी पाठविली. तो  काय आश्चर्य? राजाने त्याला भेटीला बोलावले.

« PreviousChapter ListNext »