Bookstruck

तुरुंगात 4

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

'यांचे नाव हो विजय' मुक्ताने सांगितले.

'मी अंदाजाने ओळखलेच होते.' रुक्माकाका म्हणाला.

'रुक्माकाका, तुम्ही येता आमच्याबरोबर?' तिने विचारले.

'नको. तरुणांबरोबर म्हातारी कशाला?' तो हसून म्हणाला.

'तरुणांनी पडू नये म्हणून. त्यांना आधार म्हणून' मुक्ता म्हणाली.

'विजय, मुक्ता व रुक्माकाका निघाली. वाटेत गप्पाविनोद चालला होता.'

'विजय, आता परत कधी येणार?' रुक्माने विचारले.

'आता मी येणारच नाही.' तो म्हणाला.

'जो एकदा आला, तो दुसर्‍यांदा येणारच.' रुक्मा हसून म्हणाला.

'विजय, आता येशील तो उजाडत ये. दिवसभर राहा. बाबांजवळ बुध्दिबळे खेळ. रुक्माकाका व बाबा नेहमी खेळतात मुक्ता म्हणाली.

'मला बुध्दिबळे येत नाहीत.' तो म्हणाला.

'तर मग एखादे सुंदर चित्र काढून मला दे' ती म्हणाली.

त्या फाडलेल्या चित्राचे विजयला स्मरण झाले; परंतु त्याने ती हकीगत सांगितली नाही.

'मुक्ता, तुम्ही आता परत जा. मी आता जाईन. घरी तुझे बाबा एकटे आहेत.' विजय म्हणाला.

'उद्या लग्न होऊन नवर्‍याबरोबर गेली म्हणजे त्यांना एकटेच राहावे लागणार आहे. होऊ दे थोडी एकटे राहाण्याची सवय.' रुक्मा हसून म्हणाला.

'परंतु मला मुळी लग्न करायचेच नाही.' मुक्ताच म्हणाली.

'खरेच. त्याची मला आठवणच राहात नाही.' तो म्हणाला.

ती थांबली. विजय एकटाच निघाला. रुक्मा व मुक्ता उभी होती. तीही माघारी वळली. दूर कोल्हे हुकी हुकी करीत होते.

« PreviousChapter ListNext »