Bookstruck

तुरुंगात 6

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

'खरेच की!'

'आज विजय, जेवायला काय करू? तुला काय आवडते?'

'काहीही कर. तुझ्या हातचे सारे गोड. मुक्ता, तुझे माझ्यावर प्रेम आहे की नाही?'

'मला नाही माहीत.'

'तू माझी नाही होणार?'

'नाही.'

'खरेच का तू माझी नाही होणार? मी आशेने होतो. रात्रंदिवस मी तुझा विचार करतो. हृदयात तुझी चित्रे रंगवतो. कागदावर काढतो. हे बघ तुझ्या चित्राचे तुकडे. मी तुझे एक सुंदर चित्र काढले होते. बाबांनी ते टरकावले. जणू माझ्या हृदयाचेच त्यांनी तुकडे केले. मुक्ता, ह्या तुकडयांवर मी अश्रूंचा अभिषेक केला. हे बघ.'

ते तुकडे त्याने तेथे ठेवले. मुक्ता ते तुकडे जुळवीत होती. ती काही तरी विचार करीत होती.

'विजय, तुझ्या वडिलांनी हे फाडले? आणखी काय म्हणाले?'

'म्हणाले, खबरदार या मुलीकडे जाशील तर!'

'विजय, माझ्यासाठी जर ते तुला छळीत असतील तर मी तुझीच होईन.' माझे चित्र त्यांनी फाडले का? फाडू देत. ही जिवंत मुक्ता तुझी होईल.'

'खरेच का मुक्ता'

'होय, खरेच.'

मुक्ता एकदम उठून गेली. तिने सुरेख स्वयंपाक केला. रुक्माकाकाने दूध व केळी आणली. केळयांची शिकरण. रुक्माकाकाही जेवायला राहिले.

जेवण झाल्यावर मुक्ताचे वडील व रुक्मा बध्दिबळे खेळत बसले. मुक्ता व विजय बोलत होती. पुढचे बेत ठरवीत होती. तिसरे प्रहरी रुक्माकाका, मुत्तच व विजय तिघे फिरायला गेली. एका आंबराईत बसली.

'रुक्माकाका, तुम्ही आमचे हात एकमेकांच्या हातात द्या. योजना ठरवा. मुक्ता म्हणाली.'

« PreviousChapter ListNext »