Bookstruck

मातृभूमीचा त्याग 1

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

मुक्ता, रुक्मा व विजय परत आली. विजय व मुक्ता यांचे हात एकमेकांच्या हातांत होते.

'रुक्माकाका, आज तुम्ही आमच्याकडेच झोपा. मला भीती वाटते.' मुक्ता म्हणाली.

'त्या दुष्टाला कळले तर तो दौडत येईल.' रुक्मा म्हणाला.

सारी झोपली.

इकडे तो तुरुंग शिलगला, पेटला, पहारेकरी जागे झाले. त्यांनी ग्रामणीस जाऊन सांगितले. तो दातओठ खात आला, तो तुरुंगात आला. तो कोठडीजवळ गेला. कागद पेटले होते. पेटी फोडलेली होती. चोर पळून गेला होता.

'धावा, त्या थेरडयाच्या घराला वेढा घाला. जा. विजयला जिवंत धरून आणा. जा. आता तो वाचत नाही. सरकारी इमारतीस त्याने आग लावली. आता मर लेका म्हणावे. जा, दौडा.' तो हुकूम देत होता.

मध्यरात्र झाली होती; परंतु रुक्मा जागा होता. तो धनुष्याच्या बाणांना धार लावीत होता. तो त्याने घोडयांच्या टापांचा आवाज ऐकला. त्याने मुक्ताला हाक मारली. ती उठली. विजय उठला. संकट आले. मुक्ताने काय केले, तेथे एक पेटारा होता त्यात तिने विजयला लपविले. पेटार्‍यावर अंथरूण घातले व ती निजून गेली. घोडेस्वार आले. मशाली पाजळून घरात शिरले.

'विजय कोठे आहे?' त्यांनी विचारले.

'तुम्ही तर त्याला तुरुंगात घातलेत. द्या ना माझा विजय. का छळता त्याला?' मुक्ता उठून म्हणाली.

'विजय इकडे नाही आला?'

'नाही.'

'तो तर पळून गेला तुरुंगातून.'

'येथे नाही आला.'

ते घोडेस्वार परत निघाले. गेले. विजयने आतून झाकण उघडले. तो बाहेर आला. सर्वांना आनंद झाला.

« PreviousChapter ListNext »