Bookstruck

यतिधर्माची दीक्षा 2

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

विजय विचार करू लागला. त्याला त्या मठाधिपतींचे म्हणणे बरोबर वाटले. आपण व्हावे भिक्षू, व्हावे यती असे त्याला वाटले. लहाणपणी वाचलेले धर्मग्रंथ त्याला आठवू लागले. तो आता त्या दृष्टीने विचार करू लागला. आपण सर्वत्र हिंडू, उपदेश करू, गोड बोलू, सेवा करू असे मधुर चित्र तो मनात रंगवू लागला. त्याच्या तोंडावर प्रसन्नता फुलली.

मठाधिपतींचे मठात रोज सकाळी व रात्री प्रवचन असे. विजय ऐकायला जाई. तो मठातील इतर मंडळींप्रमाणे वागू लागला. नीतिनियम, व्रतेवैकल्ये आचरू लागला. तो मोठया पहाटे उठे. नदीवर जाऊन स्नान करी. मग आपल्या खोलीत ध्यान करी. चित्त सर्व वस्तूंपासून अलिप्त करण्याचा अभ्यास करी. मग प्रवचन ऐके. दुपारी धर्मग्रंथ वाची. इतर मंडळींबरोबर प्रबोधचर्चा करी. सायंकाळी पुन्हा ध्यान करी. रात्री प्रवचनाचे चिंतन करीत झोपी जाई.

काही दिवस गेले आणि विजयादशमीचा दिवस आला. भगवान बुध्दांचा हा जन्मदिवस.
'वत्स विजय, भगवान बुध्ददेवांचा आज जन्मदिवस. मनावर विजय मिळविणार्‍या बुध्ददेवांचा हा जन्मदिवस. तूही मनावर विजय मिळविण्यासाठी धडपडत आहेस. मला असे वाटते की, तू आजच्या दिवशी यतिधर्माची दीक्षा घ्यावीस. तू आमच्यापेक्षाही थोर आहेस. तुझे वर्तन निर्मळ आहे. तुझी वाणी पवित्र व प्रेमळ आहे. अनुभवाने तुझे जीवन खोल झाले आहे. तू आमच्यात ये. बुध्ददेवांचा संदेश तू सर्वत्र पसरव.' असे मठाधिपती म्हणाले.

'महाराज, माझी तयारी आहे.'

सर्वांना आनंद झाला. भगवी वस्त्रे तयार होताच विजयने मुंडन केले. भगवी वस्त्रे त्याने परिधान केली. हातात दंड घेतला. धर्मग्रंथातील पवित्र भागाचे पठण झाले. यतिधर्माचे नियम उच्चारले गेले. विजयचे नाव सेवानंद असे ठेवण्यात आले.

सेवानंद आता आसपास जाई. उपदेश करी. तो निरनिराळया ठिकाणच्या विहारांत जाई. मठांतून जाई. प्रवचन करी. त्याची प्रशांत व प्रसन्न मुद्रा पाहून त्याच्याविषयी सर्वांना आदर वाटे.

राजगृहाच्या राजाच्या कानांवर सेवानंदांची कीर्ती गेली. एक मोठा खुनी गुन्हेगार सापडला होता. त्याला कोणती शिक्षा द्यावी, राजाला समजेना. राजाने सेवानंदांना बोलावले.

« PreviousChapter ListNext »