Bookstruck

स्वदेशात 2

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

सेवानंदाने संमती दिली. त्याला आनंद झाला. जन्मभूमी म्हणजे पुण्यभूमी! तिचे दर्शन त्याला होणार होते. त्या आपल्या मातृभूमीला तो आता पुन्हा जाणार होता. लोकांच्या मनाची मशागत करायला तो जाणार होता. लोकांच्या जीवनाची शेती सफळ व्हावी, त्यात प्रेम, सहानुभूती, सहकार्य, आनंद यांचे भरपूर पीक यावे म्हणून तो जाणार होता. मनाची शेती करणारा तो शेतकरी होता.

सेवानंद शिरसमणीस आले, त्या वेळेस रात्र होती. ते मठात उतरले. दुसर्‍या दिवशी सकाळी बुध्दमंदिराचा उदघाटन समारंभ होता. सकाळ झाली. मंगल वाद्ये झडू लागली. मंदिराच्या प्रशांत व प्रशस्त आवारात शेकडो स्त्रीपुरुष जमले होते आणि सेवानंद आले. आसनावर बसले. सर्व सिध्दता झाली. बुध्ददेवांच्या मूर्तीला प्रणाम करून, उदघाटन करून सेवानंद बोलू लागले. त्यांची ती अमृतवाणी सारे लोक पीत होते. असे भाषण त्यांनी कधी ऐकले नव्हते. असा तेजस्वी दिव्य महंत त्यांनी कधी पाहिला नव्हता. किती वेळ झाला, कळेना.

इतक्यात चमत्कार झाला! सेवानंदांची दृष्टी एके ठिकाणी गेली. कोण होती तेथे? मुक्ता तेथे होती. विजयची मुक्ता. सेवानंदांची दृष्टी तेथून हलेना. ते सारखे तेथे पाहात राहिले. शेवटी त्यांचे भान गेले. ते बेशुध्द होऊन पडले. एकच हाहाकार उडाला. सेवानंदांस माईजींच्या पर्णकुटीत नेण्यात आले.

पर्णकुटीत सेवानंद एका कांबळयावर पडले होते. रात्रीची वेळ होती.

'माईजी, तुम्ही मला ओळखलेत?'

'होय. तू विजय!'

'माझी मुक्ता जिवंत आहे?'

'तुझी आठवण काढून ती रोज झुरते. आशेने ती जीवंत राहिली आहे. तुझा बाळ शशिकांत तुझी वाट पाहात आहे.'

'बाळ?'

'हो. तू गेल्यावर मुक्ता बाळंत होऊन बाळ झाला. तुझ्यासारखेच बाळाचे डोळे आहेत. तुला आम्ही पत्र पाठवले होते, राजगृहाच्या पत्त्यावर.'

« PreviousChapter ListNext »