Bookstruck

चित्रेचे लग्न 1

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

निर्मळपूर तालुक्यात गोडगाव म्हणून एक खेडे होते. गोडगावला एक मोठे जहागीरदार होते. त्यांच्या मुलाचे नाव चारू. एकुलता एक मुलगा. फारच देखणा होता तो मुलगा. चारू जसा दिसायला सुरेख होता, तसाच स्वभावानेही चांगला होता. सारा गाव त्याच्यावर प्रेम करी.

चारूचे मराठी शिक्षण संपले त्याने इंग्रजी शिक्षणही घेतले. थोडे दिवस कॉलेजमध्येही तो होता; परंतु १९३० सालच्या चळवळीत त्याने कॉलेज सोडले.तो चळवळीत भाग घेणार होता, परंतु आईबापाच्या सांगण्यामुळे तो तुरूंगात गेला नाही.

तो तेव्हापासून घरीच असे. घरीच वाची. घरचा एक मळा होता त्या मळ्यात काम करी. शेतक-यांवर तो फार लोभ करी. शेतक-यांची बाजू घेऊन भांडे.

बळवंतरावांच्या कानांवर चारूची गोष्ट आल्याशिवाय राहिली नाही. ते एकदा गोडगावला मुद्दाम गेले होते. जहागीरदारांकडे उतरले होते. मेजवानी झाली. चारूला पाहून त्यांना आनंद झाला.

‘तुम्ही सत्याग्रह संपल्यावर पुन्हा का नाही गेलात कॉलेजात? शिक्षण पुरे झाले असते.’ बळवंतरावांनी विचारले.

‘शिक्षण म्हणजे ज्ञानच ना? ते घरी बसूनही मला मिळवता येईल. मला नोकरीचाकरी करायची नाही. घरीच बरे. मळ्यात खपावे. शेतक-यांत असावे. त्यांची बाजू घ्यावी. हाच माझा आनंद.’ चारू म्हणाला.

‘आणि लग्न नाही का करायचे?’

‘आई व बाबा आहेत. त्यांना ती काळजी.’

अशी बोलणी चालली आहेत, तो जहागीरदार आले.

‘काय हो, यांचे लग्न नाही का करणार?’

‘हो, आता करायला हवेच. चारूच ‘इतक्यात नको’ असे म्हणतो. त्याच्या आईने पाहिली आहे एक मुलगी. तिच्या एका मैत्रिणीची मुलगी आहे चारूने त्या मुलीजवळच लग्न लावावे असे तिला वाटते. होय ना रे चारू?’

‘परंतु मला नको ती मुलगी. मी आजोळी गेलो होतो, तेव्हा पाहिली होती. आईचा उगीच हट्ट. त्या मुलीजवळ लग्न लावण्याऐवजी मी असाच राहीन.’ ‘परंतु, अरे, दुस-या मुली येतील.’

‘अहो, चांगल्या मुलाकडे मुलींचे आईबाप खेपा घालतात.’

« PreviousChapter ListNext »