Bookstruck

चित्रेचे लग्न 6

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

‘चारु, तू सुद्धा बस. रामाच वाढील. सारे चालतेच आपणाला.’ जहागीरदार म्हणाले.

‘रामाच्या ऐवजी रहीम असता तर चालता का हो वाढायला?’ चित्राने विचारले.

‘चित्रा, पुरे आता.’ बळवंतराव म्हणाले.’

पाने वाढली गेली. सारी बसली. चित्राचे पान रिकामे होईना.

‘चित्रा, आटप की.’ पित्याने सांगितले.

‘पोट भरलेले आहे.’ ती म्हणाली.

‘जेवल्यावर मळ्यात हिंडा-फिरा झोके घ्या. सारे पचून जाईल.’ चारु म्हणाला.

‘परंतु बाबा म्हणतात, उन्हात जाऊ नको.’ चित्रा म्हणाली.

‘परंतु झोका झाडाला आहे. तेथे ऊन नाही.’ चारु म्हणाला.

‘जेवल्याबरोबर का कोणी झोके घेतात?’ ती म्हणाली.

‘जेवल्यानंतर जरा झोपून मग घ्या. येथल्या विहिरीचे पाणी पाचक आहे. काही बाधत नाही. होय ना बाबा?’ तो म्हणाला.

‘होय. फार छान पाणी.’ जहागीरदार म्हणाले.

‘मला हा मळा फार आवडला. येथेच राहावे. मोट आहे, फुले आहेत. झोका आहे, फळे आहेत.’ चित्रा यादी सांगत होती.

‘आणखी काय काय आहे?’ पित्याने हसून विचारले.

‘काय काय तरी आहे. अजून सारे नीट लक्ष देऊन थोडेच पाहिले आहे!’

जेवल्यावर पाहीन.’ ती म्हणाली.

मजेने हसत खेळत बोलणी चालली, तो पाणी पिताना चित्राला ठसका लागला. अळसूद गेले. ती घाबरली. ‘वर बघ, वर बघ. सासू टांगलेली आहे.’ बाप हसून म्हणाला.

‘सासूच सुनेला टांगीत असेल.’ चारु हसून म्हणाला.

‘नव्या युगात आता सुनाच सास्वांना टांगतील.’ जहागीरदार म्हणाले.

‘किती ठसका लागला. फातमाने आठवण काढली असेल. तिचे लग्न लागले असेल.’ चित्रा म्हणाली.

जेवणे झाली. बंगलीतील बैठकीवर सारी बसली. तेथे पानसुपारीचे तबक होते. सर्वांनी विडे खाल्ले; परंतु चित्राने पान घेतले नाही.

‘तुम्हाला नको का?’ चारुने विचारले.

« PreviousChapter ListNext »