Bookstruck

चित्रेचे लग्न 9

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

आणि तुमचे जसे व्हायचेच नाही!’ चारूही हसून म्हणाला,

‘तुमचे दोघांचे लग्न केव्हा तरी होईलच. आज ना उद्या तूही करशील, तूही करशील.’ बळवंतराव म्हणाले.

‘बाबा, कोपर दुखते आहे हो, ती म्हणाली.

‘घरी गेल्यावर आयोडाईन लावीन हो.’

ते झोंबेल.’

‘जरा झोंबेल. मग बरे वाटेल.’

‘चला आता! पुरे खेळ बाबा.’

‘कंटाळलीस? चला तर.’

गाडी जोडली गेली. गाडीत गादी, दोन तक्क्ये ठेवण्यात आले. जहागीरदारांनी दोघांना फुलांचे गुच्छ दिले.

‘खरे, मीसुद्धा एक करून ठेवला होता.’ चित्रा आठवण आल्यासारखे करीत म्हणाली.

‘मग जा, तो घेऊन ये.’ बाप म्हणाला.

‘नको आता. हा एक पुरे. तो राहु दे येथेच. नाही तर यांना होईल.’

इतक्यात चारु तो गुच्छ घेऊन आला व चित्राला देऊ लागला. अहो, मीच तो केलेला. मीच केलेला मला काय देता? तुम्हालाच घ्या तो.’ ती म्हणाली.

आणि तुम्हाला आत्ता मी दिले ते चारुनेच केलेले होते.’ जहागीरदार म्हणाले.

‘परंतु मी केलेला अधिक सुंदर आहे.’ ती म्हणाली.

‘बायकांना अधिक कला असते.’ चारु म्हणाला.

‘अच्छा, फार मौज आली.’ बळवंतराव म्हणाले

‘तुमची मौज, मी मात्र पडल्ये, दुखावले.’ चित्रा म्हणाली.

‘परंतु मळा आवडला ना?’ जहागीरदारांनी हसत विचारले. 

‘हो! फार आवडला.’

‘येत जा अशी मधूनमधून.’ जहागीरदार म्हणाले.

गाडी निघाली. जहागीरदार व चारू थोडे अंतर पोचवीत आले व नमस्कार करून मागे वळले.

चित्रा व बळवंतराव घरी आली. चित्रा झोक्यावरून पडल्याची हकीगत  सर्वांना समजली. कपाळाला रूमाल बांधलेला होताच. श्यामू, रामू, दामू सारे ताईंची थट्टा करू लागले.

‘ताई, तुला दाखवायला ना नेले होते?’ श्यामूने विचारले.

« PreviousChapter ListNext »