Bookstruck

चित्रेचे लग्न 11

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

‘स्वरूपाने सुंदर व गुणांनीही सुंदर आहे. असा मुलगा मी पाहिला नाही आणि चित्रा व तो चारु, जणू पूर्वीची ओळखीची अशा त-हेने बोलत होती काय ऋणानुबंध आहे कळत नाही. आपली तरी इकडे लांब बदली होईल असे कोणाला वाटले होते? जणू चित्राच्या लग्नासाठीच देवाने आणले असे आपले मला वाटते. जमले तर करावे ना? का नको इतक्यात?’

‘आता काही तशी लहान नाही चित्रा. तिला सारे समजते. कशाला लांबवा? वेळीच सारे बरे असे मला वाटते. उगीच लांबवण्यात अर्थ नाही.’ सीताबाई म्हणाल्या.

पुढे काही दिवसांनी बळवंतरावांनी जहागीरदारांना खरेच विचारले.

‘तुमचा चारु तयार आहे ना?’ बळवंतरावांनी प्रश्न केला.

‘तो तयार आहे, कारण आपल्या आईजवळ तो तसे बोलला. करीन लग्न तर चित्राशीच, असे त्याने सांगितले.’ जहागीरदार म्हणाले.

‘तुम्हालाही पसंत आहे ना?’

‘अहो, अशी नक्षत्रासारखी मुलगी कोणाला सुन म्हणून आवडणार नाही? चारुच्या आईचीच जरा समजूत घातली पाहिजे.’

‘तुम्हाला हुंडा हवा असेल तितका देईन. एकदा माझ्या चित्राला चारु वर मिळो हीच ईच्छा.’

‘अहो, हुंडा नकोच. आम्हाला का काही कमी आहे? आणि चारुने हुंडा घ्यायचा नाही ही गोष्ट मला कधीच सांगितली आहे. हुंडा घेईन तर चारु पळून जाईल. तुम्हाला काय द्यायचे ते तुम्ही प्रसन्नपणे चारुला व चित्राला द्या. रावसाहेब, माझे खरोखर भाग्य की, तुमच्यासारख्या सज्जनांशी संबंध  जोडण्याची संधी मिळाली. मी चारुच्या आईची समजूत घालीन. आपण ठरवून टाकू.  समजून चाला की, ठरले असे.’ जहागीरदार म्हणाले.

चित्राच्या लग्नाच्या गोष्टी सर्वत्र पसरल्या. ती आता शाळेत जाईना. मुले मोठ्याने बोलून चिडवीत. ती घरीच वाची. घरीच राही.

तिकडे चारुच्या आईची समजूत घालणे चालले होते.

‘मला काही ही मुलगी पसंत नाही. चारु, तू लहान होतास तेव्हापासून माझ्या मैत्रिणीला मी सांगितले आहे की, तुला मुलगी झाली तर माझ्या चारुला करीन. का रे नाही ती तुला पसंत?’ चारुच्या आईने विचारले.

« PreviousChapter ListNext »