Bookstruck

चित्रेचे लग्न 12

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

‘मला ती नको वाटते.’ चारु म्हणाला.

‘अग, पण चारुला जर ही चित्रा पसंत आहे, तर तू का आड येतेस? त्यांना जन्म काढायचा आहे.’ जहागीरदार म्हणाले.

‘ही चित्रा म्हणे फार फटाकडी आहे. चारुजवळ मळ्यात आपली एकदम हसू-बोलू लागली आणि मुसलमांनांशी म्हणे तिची मैत्री. मुसलमांनांच्या मुली मैत्रिणी! त्यांच्याकडे विडे खाते. नको ही असली मुलगी. आपण खेड्यातील माणसे. ह्या अशा लाडावलेल्या व शेफारलेल्या मुली उद्या वाटेल ते करतील. तोंडाला काळेही फासायच्या. माझे ऐका. चारु, आईचे ऐक. ती माझ्या मैत्रिणीची मुलगी कर.’ आईने पुन्हा जोरदार सांगितले.

‘का ग आई. तुझ्या माहेरी नाही वाटते मुसलमान येत? तुमच्याकडे तर मुसलमानांशीच व्यवहार. मी आजोळी येतो तेव्हा बघतोच सारे. मुसलमान वाईट, तर आजोळी कशाला त्यांच्याशी व्यवहार करतात? उगीच काही तरी तू बोलतेस. त्या चित्राची एक मुसलमान मैत्रीण तिच्या वर्गातील होती. ती देई एखादे वेळेस तिला पट्टी. दुसरे कोणी मुसलमान नव्हते देत. तिने मोकळेपणाने मळ्यात सांगितले. गड्यांनी येऊन तुला काय सांगितले? तुझे हेर पाठविले होतेस वाटते मळ्यात, आम्ही काय काय बोलतो, काय काय करतो, किती हसतो  ते पाहायला? आई, माझे लग्न करायचेच असेल तर चित्राजवळच करा. माझ्या जीवनाच्या दिवाणखान्यात चित्राचाच प्रवेश. दुसरे कोणी नको तेथे डोकावायला.’

‘बरे हो चारु, तुमचे ठरले असेल तर मी कशाला आड येते!’

‘मग ठरवू ना मुहूर्त?’ जहागीरदारांनी विचारले.

‘बाबा हुंडा नको हो.’ चारुने सांगितले.

‘नाही हो.’ ते म्हणाले.

बळवंतरावांच्या विचाराने जहागीरदारांनी मुहूर्त ठरविला.

‘तुमच्या खेड्यात आम्ही येऊ की तुम्ही निर्मळपूरला याल?’ बळवंतरावांनी विचारले.

‘जशी तुमची इच्छा.’

‘चित्रा तर म्हणते की, तुमच्या गावीच लग्न व्हावे. त्या मळ्यात आम्ही जानोशाला उतरू. मळ्यात आमचा मंडप.’

‘जशी तिची इच्छा.’ जहागीरदार म्हणाले.

आणि ज्या मळयात चित्रा व चारु यांची प्रथम भेट झाली, दृष्टादृष्ट झाली, ज्या मळ्यात तिने झोके घेतले, त्याच मळ्यात सुंदर मंडप घालण्यात आला. मोठ्या थाटाने लग्न झाले. शेतक-यांस मेजवानी देण्यात आली. निर्मळपूरचेही पुष्कळ प्रतिष्ठित लोक आले होते. फातमाचे प्रेमळ पत्र व लग्नभेट आली होती. चित्रा व चारु यांनी परस्परांस माळा घातल्या. सर्वांना आनंद झाला.

« PreviousChapter ListNext »