Bookstruck

सासूने चालवलेला छळ 3

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

असे दिवस जात होते आणि त्यातच दु:खाची गोष्ट म्हणजे चित्राच्या वडिलांची दूर बदली झाली. त्या दिवशी ती माहेरी गेली होती. वडील जाणार होते. सारी भावंडे जाणार होती. चारुही आला होता.

‘आजच येतेस का?’

‘नेईन हो बाळ. तुझे कसे चालले आहे? सासूबाई आताशा कशा वागतात?’

‘सासूबाईंशी मला काय करायचे आहे? माझे माणूस मोलाचे आहे. लाखात असे सापडायचे नाही. बाबा, खरेच हो, चारु म्हणजे प्रेमसिंधू आहे. तुम्ही काळजी नका करू. पत्र पाठवीत जा हां मला.’

‘पाठवीन हो.’

इतक्यात श्यामू, रामू, दामू आले.

‘ताई आम्ही चाललो.’

‘आता भाऊबीजेला या.’ ती म्हणाली.

‘तू ये आमच्याकडे. तुझ्याकडे आम्ही आलो तर तुझी सासू मारील. ताई मारकुटी आहे का ग ती? तुला खरेच ती मारते?’ रामूने विचारले.

‘नाहीहो मारीत...त्यासुद्धा आता प्रेम करतात माझ्यावर. असे बोलत नका जाऊ हो कोठे.’ आणि चित्रा उठून गेली. आईजवळ गेली. सीताबाई आवराआवर करीत होत्या.

‘चित्रा, सांभाळ हो. सासूचा स्वभाव निवळेल हो. असतात काही खाष्ट सास्वा; परंतु पुढे त्याही चांगल्या वागू लागतात. तुला मूलबाळ झाले म्हणजे सारे ठीक होईल. आजीच्या मांडीवर नातवंड खेळू लागले म्हणजे नातवंडाची आईही मग आवडू लागते.’

‘आई, तू चिंता नको करू. मला किती त्रास झाला तरी चारु दोन शब्द बोलला की, मी पुन्हा हसू लागते.’

‘असेच तुमचे प्रेम राहो.’

« PreviousChapter ListNext »