Bookstruck

चित्रावर संकट 5

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

‘शुक्रवार, मंगळवार नकोत. त्या दिवशी गर्दी असते. मध्येच एखाद्या दिवशी जा. येत्या बुधवारी चालेल?’

‘हो चालेल.’

‘सायंकाळी हं.’

‘ठीक.

‘चारूची आई घरी परत आली. त्यांचे ते दुष्ट कारस्थान ठरले.

‘चित्रा, उद्या बुधवारी आपण पुत्रदादेवीला जाऊ हो.’

‘आजच गेलो तर ? आज देवीचा वार आहे.’

‘आज गर्दी असते. देवीची प्रार्थनासुद्धा नीट करायला मिळत नाही. देवीला सारे वार सारखेच. भाव हवा. वार कोणता का असेना?’ अंगाखांद्यावर नको हो फार घालू. जरा रानात आहे देऊळ. न जाणो. कोणी भेटायचेसुद्धा. चोरबीर नसतात म्हणा; परंतु जपलेले बरे. तेथे नटूनथटून मिरवायला थोडेच जायचे आहे?’

‘उद्या किती वाजता जायचे?’

‘जाऊ तिस-या प्रहरी.’

‘कोण कोण जाणार?’

‘गर्दी नको. तू नि मी. मनापासून पाया पडू हो.’

‘बरे.’

बुधवार उजाडला. आज काय असेल ते असो, चित्राला सारखी चारूची आठवण येत होती. जेवताना त्याचे घास ती घेत होती. तिच्या डोळ्यांतून मध्येच पाणी येई. आज देवीला जायचे. चारूला पत्र ठेवू का लिहून? तो का आठवण काढतो आहे माझी? त्याला लिहित्ये की आज देवीला जात आहोत. मुख्य काम झाले, ये मला न्यायला. लिहावेच असे. ती जेवण झाल्यावर एका खोलीत गेली आणि चारूला पत्र लिहीत बसली.

प्रियतम चारू,

काय रे तुला लिहू? तुझी आठवण अक्षरश: पदोपदी येते. देवीला आज जात आहे. मनोरथ पूर्ण होवोत. तू मला लवकर न्यायला ये. तुझ्याशिवाय मला चैन नाही पडत. काही सुचत नाही. तुला पुष्कळ लिहावेसे वाटते, परंतु काय लिहू? किती लिहू? आज सारखे वाईट वाटत आहे. का बरे? तू का माझी आठवण काढून रडत बसला आहेस? वेड्या, रडू नकोस. बायका रडतात. पुरूषांना रडणे नाही हो शोभत. मला लवकर ने मग आपण हसू हो. ये लौकर.

सदैव तुझी,
चित्रा

« PreviousChapter ListNext »