Bookstruck

आमदार हसन 1

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

फातमाच्या वडिलांचे नाव हसन. ते आमदार होते. स्वभावाने मोठे दिलदार व गोड. सर्वांशी त्यांचा परिचय. फातमा त्यांच्या पहिल्या बायकोची मुलगी. फातमा आजोळीच वाढली. हसन यांचा नवा दुसरा संसार भरभराटत होता. मुलेबाळे होती. मोठा पसारा होता. फातमाने बापाला ‘ताबडतोब या, महत्वाचे काम आहे,’ अशी तार केली. हसनसाहेबांना तार मिळाली, त्यांचे उत्तर आले. ‘येतो.’ उत्तराची तार आली तेव्हा दिलावर घरी नव्हता. चित्रा पळून गेली, असे मोलकरणीने त्याला सांगितल्यापासून तो जरा पिसाळला होता. त्याला भीतीही वाटत होती. खटला वगैरे व्हायच्या. ती मुलगी हुशार व सुशिक्षित होती. नेमकी पोलीस घेऊन यायची, असे त्याच्या मनात येई व तो घाबरे.

तो जरा त्रस्त संचित असा घरी आला.

‘दिलावर, बाबांची तार आली आहे.’

‘तार?’

‘हो. ते येत आहेत उद्या सकाळच्या गाडीने. तू स्टेशनवर जा मोटार घेऊन.’

‘का येत आहेत?’

‘कोणास ठाऊक?’

‘कोठे आहे तार?’

‘येथेच कोठे तरी होती. परंतु तारेत ‘येतो’ एवढेच होते.’

दुस-या दिवशी सकाळी दिलावर मोटार घेऊन स्टेशनवर गेला. दुसरेही प्रतिष्ठित लोक त्याने बोलावले होते. हारतुरे होते. गाडी आली. आमदार हसन आले. दिलावर सामोरा गेला. लोकांनी हार घातले. पोर्टरने सामान उचलले. बाहेर मोटार तयार होती. मोटार निघाली.

‘दिलावर, काय काम आहे?’ आमदार हसन यांनी विचारले.

‘कसले काम?’

‘फातमाच्या सहीची तार आली, ‘काही महत्वाचे काम आहे. ताबडतोब या.’ म्हणून तर मी तर आलो, सारी कामे बाजूस ठेवून आलो.’

« PreviousChapter ListNext »