Bookstruck

आमदार हसन 3

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

‘बाबा, माझी एक मैत्रीण आली आहे येथे लहानपणाची! तिलाही मी जेवायला बोलावलो आहे. तिची आवडती भाजी करणार आहे. दिलावर, टमाटो, कोबी, वगैरे आण हो. फळे आण. पोपया आण. आज बाबांना व माझ्या मैत्रिणीला मेजवानी!’ दिलावर गोंधळला. तो निघाला बाजारात.

‘लौकर ये हो दिलावर.’

‘अच्छा!’

दिलावर विचार करीत होता. ‘फातमाची ही कोण मैत्रीण? तीच मुलगी. दुसरी कोण असणार? तिने मला सारे सांगिलतेच होते. ती मुलगी पळून पुन्हा फातमाला भेटली वाटते? फातमाचा पत्ता तिला काय माहीत? बरेच दिवसांत तर त्यांचा पत्रव्यवहार नाही. त्या मोलकरणीने फातमास सांगितले का?’ तो विचारात मग्न होता. बाजारात त्याने आज खूप खरेदी केली. भाज्या, फळे, सर्व काही विकत घेऊन पाटीवाला करून तो घरी आला.

‘फातमा, काय करतेस?’

‘पु-या तळीत आहे. दिलावर, श्राखंड घेऊन ये. जा.’

‘फार प्रेमाची मैत्रीण आहे वाटते? मला खर्च नको करूस असे सांगतेस आणि तू आता खर्च करतेस तो?’

‘दिलावर, माझी मैत्रीण कधी तरी आली आहे? रोज तुझे ते शेकडो दोस्त येतात. नको हो आणू श्रीखंड!’

‘आणीन! श्रीखंड आणीन, बासुंदी आणीन!’

दिलावर गेला आणायला. फातमाने रसोई केली; टमाटोचा रस्सा केला; कच्चा कोबीची कोशिंबीर; खोब-याची चटणी. दिलावरही श्रीखंड घेऊन आला.

‘केव्हा येणार तुझी मैत्रीण?’

‘येईल! तुला भूक का लागली? बाबा नि तू बसता का? आंम्ही दोघी मैत्रिणी मागून बसू. मी बाबांना विचारून येते.’

फातमाला दिवाणखान्यात आली. ताजी वर्तमानपत्रे आमदारसाहेब वाचीत होते.

‘बाबा, बसता का जेवायला? मैत्रिणीला यायला अवकाश आहे.’

‘आपण बरोबरच बसू. मी ही जरा बाहेर जाऊन येतो. दिलावर कोठे आहेत?’

इतक्यात दिलावर तेथे आला.

‘काय?’त्याने विचारले.

‘दिलावर, जरा बाहेर येता? आपण जाऊन येऊ एके ठिकाणी. तोपर्यंत फातमाची मैत्रीणही येईल.’

« PreviousChapter ListNext »