Bookstruck

आनंदी आनंद 2

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

असे म्हणून आमदार हसन ठाण्यास आले. ते त्या वेड्यांच्या दवाखान्यात गेले. तेथील डॉक्टरांना भेटले. तो तेच बळवंतराव असे ठरले. हसनसाहेबांस आनंद झाला.

‘त्यांच्या पत्नी, मुलेबाळे येथे जवळच राहातात. त्यांचा गडी भोजू येथे येतो. असा गडी पाहिला नाही बोवा. धन्याचे सारे कुटुंब जणू तो पोशीत आहे. धन्य त्या भोजूची. गरीब माणसे व फार न शिकलेली; परंतु हुसेनसाहेब, किती उदात्तता त्यांच्या जीवनात आढळते!’ डॉक्टर म्हणाले.

‘आमच्या फातमाचीही मोलकरीण पाहा ना. बळवंतरावांच्या घराचा रस्ता कोणी दाखवील का?’

‘याच मोटारीतून तुम्हाला पोचवतो.’

‘आभारी आहे, डॉक्टरसाहेब.’

‘अहो आभारी कसचे?’ आम्ही सर्वांनी तुमचे आभार मानले पाहिजेत. तुम्ही एका हिंदू मुलीसाठी किती ही खटपट चालविली आहे! चला.’

मोटारीतून दोघे दत्तमंदिरात आले. दत्तमंदिरातील डॉक्टर मोटारचा आवाज ऐकुन बाहेर आले, तो वेड्यांच्या दवाखान्याचे डॉक्टर!

‘काय डॉक्टर!’

‘आता इकडे कोठे आलेत?’

‘बळवंतरावांची मंडळी येथे राहातात ना? त्यांच्या मुलीचा शोध लागला आहे. ती मुंबईस सुरक्षित आहे.’

‘त्या पलीकडच्या खोलीत त्या राहातात. चला, मी येतो.’

‘सीताबाई जप करीत होत्या. मुले शाळेत गेली होती. भोजू दुकानात सामान आणायला गेला होता.

‘सीताबाई’

‘कोण?’

‘मी डॉक्टर.’

‘काय हो डॉक्टर?’

‘हे हॉस्पिटलचे डॉक्टर आले आहेत. त्यांच्याबरोबर हे एक मुसलमान आमदार आहेत. तुमची चित्रा सापडली.’

« PreviousChapter ListNext »