Bookstruck

ज्याला ज्ञान, त्याला मान 3

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

“साडेचार ?”

“हो.”

“आमच्याजवळून तर पाच पाच रुपये घेतले.”

“तुम्ही कसे दिलेत ? त्याच्यावर तर लिहिलेलं आहे.”

“मास्तर म्हणाले- एकादशी आहे, तिकीटं महाग आहेत !”

“एकादशीला रताळी महाग होतील, शेंगाचे दाणे महाग होतील, तिकीटं का महाग होतात ?”

“आम्हांला काय भाऊ, माहीत ?”

“तु्म्ही पंढरपूरला जाल, परंतु शिकणार नाही. ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरी लिहिली तुमच्यासाठी. परंतु वाचायला कोण शिकतो ? असे अडाणी राहता. सारं जग मग फसवतं, अपमान करतं. शिका, सेवादलाचे सैनिक तुम्हांला शिकवतील. पुढच्या वर्षी पंढरीला जाल तर ज्ञानेश्वरी, गाथा, गीताई वाचीत जा, खरं ना ?”

“खरं रे भाऊ. हवं शिकायला. शेतक-यांचं कुणी नाही बघा. सार्‍या जगाचा तो पोशिंदा, परंतु त्याचा सगळीकडे अपमान.”

“आता ज्ञान मिळवा. स्वराज्य हाती घ्या. ज्याला ज्ञान त्याला मान.”

“मामलेदार कचेरीत ज्याच्या हातात वर्तमानपत्र त्याला खुर्ची देतात आणि आम्हांला दूर बसवतात.”

“खरं ना ? तुम्ही वाचायला शिका. शेत नांगरणारा दुपारच्या वेळेस झाडाखाली बसून भाकर खाताना वर्तमानपत्र वाचू लागेल तेव्हा खरं स्वराज्य येईल. समजलं ना ?”

“होय दादा. आज चांगलेच डोळे उघ़डले. विठ्ठला, आता तुझी आणभाक ! शिकल्यावाचून राहायचं नाही.”

“छान. आता अभंग म्हणा.”

त्या शेतकरी वारकर्‍याने पुन्हा एक सुंदर अभंग म्हटला. रघुनाथ डोळे मिटून ऐकत होता.

« PreviousChapter ListNext »