Bookstruck

माणूस होण्यासाठी शिका 2

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

“सरकार जमाखर्च दाखवा म्हणते.”

“आमचा उघडा हिशेब. सारा तोंडी सांगू. म्हणावं, आमची घरं बघा. गाडगीमडकी रिकामी आहेत. ती सांगतील की या घरात यंदा दाणे नाहीत.”

“साहेबाला पांढर्‍यावरच काळं समजतं. त्याला हिशेब हवा. काय करायचं ? तुम्हांला सारी दुनिया नाडते तरी तुम्ही चार अक्षरं शिकणार नाही. शिका म्हटलं तर म्हणालः ‘आम्हांला का मामलेदार, मुन्सफ व्हायचं आहे ?’ बाबा रे, माणसासारखं या जगात वागायचं असेल तर शिकलं पाहिजे. पदोपदी अडतं. पत्र लिहिता येत नाही, आलेलं वाचता येत नाही. पत्र लिहिणाराला द्या पैसा. मनीऑर्डर लिहिणाराला द्या पैसे. आधीच गरिबी, त्यात ही अशी दक्षिणा वाटायची. कधी तुमचे डोळे उघडायचे ? शिका. उद्या स्वराज्य आलं, तर ते कसं
टिकवायचं याची मला चिंता वाटते.”
“येणार का भाऊ स्वराज्य ?”

“येणार, इंग्रज जाणार.”

“गांधीबाप्पाची पुण्याई.”

“परंतु गांधीबाप्पांची पुण्याई कोठवर पुरणार ? आपण चांगले होऊ या. शिकू या. उद्योगी होऊ या. प्रेमानं राहू या. स्वच्छता ठेवू या.”

“होय, दादा. उद्यापासून मी हातात पाटी घेतो. आम्ही अडाणी म्हणून तर जगाचे पोशिंदे असून उपाशी मरतो !”

“बरोबर बोलतात. शिका, खरं स्वराज्य आणा.”

« PreviousChapter ListNext »