Bookstruck

बापूजींच्या गोड गोष्टी 15

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

१६

महात्माजींची प्रत्येक गोष्ट हेतुपूर्वक असे. त्यांच्या कपड्यांतील फरक पाहत गेलो तर त्यांच्या जीवनातील क्रांती कळून येईल. बॅरिस्टर असताना त्यांचा अगदी युरोपियन पोषाख होता. पुढे तो गेला. आफ्रिकेत सत्याग्रही पोषाख असे. हिंदुस्थानात आले तेव्हा काठेवाडी पागोटे, धोतर असा होता, परंतु एका फेट्यात कितीतरी टोप्या होतील हे पाहून तो टोपी-गांधी टोपी-घालू लागले. पुढे सदरा, टोपी यांचाही त्याग करून फक्त एक पंचा नेसूनच हा महापुरुष राहू लागला आणि पंचा नेसूनच ते सम्राटाला लंडनमध्ये भेटले. त्यामुळे चर्चिल त्या वेळेस चिडला. गरिबांतल्या गरिबांशी एकरूप होण्यासाठी महात्माजींचा आत्मा तडफडत असे.

एकदा एका शाळेला भेट द्यायला महात्माजी गेले होते. हास्यविनोद चालू गोता. एक मुलगा काही तरी म्हणाला, मास्तरांनी रागाने त्याच्याकडे पाहिले. महात्माजी त्या मुलाजवळ गेले व म्हणाले:

‘तू मला हाक मारलीस? काय सांगायचं आहे बाळ? सांग, भिऊ नकोस.’

‘तुम्ही सदरा का नाही घालीत? मी माझ्या आईला सांगू का? ती सदरा शिवून देईल. तुम्ही घालाल का? माझ्या आईच्या हातचा सदरा तुम्ही घालाल का?’

‘घालीन, परंतु एक अट आहे बाळ. मी काही एकटा नाही.’

‘मग आणखी किती हवेत? आई दोन देईल शिवून.’

‘बाळ, मला ४० कोटी भावंडं आहेत. चाळीस कोटींच्या अंगावर वस्त्र येईल तेव्हा मलाही मग सदरा चालेल. तुझी आई ४० कोटी सदरे देईल का शिवून?’

महात्माजींनी मुलाची पाठ थोपटली. ते निघून गेले. गुरुजी आणि विद्यार्थी राष्ट्रातील दरिद्रीनारायण डोळ्यांसमोर येऊन गंभीर झाले. महात्माजी राष्ट्राशी एकरूप झालेले होते. ते राष्ट्राची मायमाऊली होते.

« PreviousChapter ListNext »