Bookstruck

बापूजींच्या गोड गोष्टी 31

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

३२

१९३० मधील गोष्ट. सत्याग्रहाचा लढा, मिठाचा सत्याग्रह अजून सुरू झाला नव्हता. परंतु महात्मा गांधी ८० सत्याग्रहींच्या तुकडीनिशी साबरमतीच्या आश्रमातून बाहेर पडले होते. मी सत्याग्रह केल्याशिवाय कोणी करू नये अशी त्यांची आज्ञा होती. महात्माजींची ती दांडीची यात्रा सुरू झाली. देशभर तेजाचे झोत जात होते. महात्माजींची वाणी देशभर जात होती. साता-समुद्रांपलीकडे जात होती. देशभर देशभक्तीच्या लाटा उसळत होत्या. महात्माजींचा एके ठिकाणी आज मुक्काम होता. सायंकाळी विराट सभा झाली. महापुरुषाची वाणी ऐकून लोक पावन झाले. संस्फूर्त झाले. सभा संपली. महात्माजींची प्रार्थना झाली. सत्याग्रहींची भोजने झाली. महात्माजींचे अंथरूण पसरण्यात आले. गच्चीत आकाशाखाली महापुरुष झोपला होता. महात्माजींची झोप म्हणजे योगी पुरुषाची झोप. ती गाढ झोप होती.

रात्रीची दोन-तीन वाजण्याची वेळ होती. बाहेर स्वच्छ चांदणे होते. महात्माजींच्या तपाप्रमाणे ते शांत होते, सुंदर होते. महात्माजी उठले, त्यांना बरीचशी पत्रे लिहावयाची होती. ते हळूच उठले. कंदील जवळ होता. त्याची वात मोठी करून ते लिहावयास बसले.

परंतु कंदीलातील तेल संपले. प्रकाश मंद होऊ लागला. वातच जळू लागली. शेवटी कंदील विझला. आता काय करणार? स्वयंसेवक, सत्याग्रही दमून भागून झोपले होते. महात्माजींनी त्यांना उठवले नाही. ते तेथेच चंद्राच्या मंदमधुर प्रकाशात लिहू लागले.

कोणी तरी उठले. महात्माजी लिहित आहेत असे पाहून ते गृहस्थ बापूंजवळ आले.

‘बापू, चंद्राच्या प्रकाशात लिहायला दिसतं का? डोळ्यांना त्रास नाही का होत? तुम्ही कोणाला उठवलं का नाही? आणि या लोकांनी कंदिलात तेल नको होतं का नीट भरून ठेवायला?’ ते गृहस्थ रागाने बोलू लागले.

‘मला चांदण्यात लिहायला दिसतं आहे. वाचायला मात्र दिसत नाही. निजू दे त्या सर्वांना. सारे दमलेले आहेत. तुम्हीही शांतपणे जरा पडा. अजून बरीच रात्र आहे. गांधीजी शांतपणे म्हणाले.

स्वयंसेवकांना न उठवता चांदण्यात पत्रे लिहिणारी, राष्ट्रपित्याची ती प्रेमस्नेहमयी मूर्ती डोळ्यांसमोर येऊन माझे अंत:करण उचंबळून येत असते.

« PreviousChapter ListNext »