Bookstruck

बापूजींच्या गोड गोष्टी 40

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

४१

ही दिल्लीची गोष्ट. बिर्लाभवनात गांधीजी उतरले होते. ते स्नानघरात गेले. श्री. बिर्लाशेठ नुकतेच आंघोळ करून गेले होते. त्यांचा धोतराचा बोळा तेथेच पडलेला होता. बापूंनी ते धोतर धुतले, नंतर स्नान करून स्वत:चा पंचा धुऊन बाहेर आले आणि पंचा वाळत घालून बिर्लाशेठजींचे धोतरही झटकून वाळत घालीत होते. इतक्यात शेटजी आले. ते एकदम धोतर हिसकून घेऊन म्हणाले :

‘बापू, हे काय?’

‘तिथंच पडलं होतं; कोणाचा पायबिय पडायचा स्वच्छ धोतरावर. धुतलं. त्यात काय बिघडलं? स्वच्छतेच्या कामाहून अधिक थोर काम तरी कोणतं?’

४२

मद्रास प्रांतातील हरिजन दौरा सुरू होता. एका स्टेशनाजवळ खाण्याची व्यवस्था करण्यात आसी होती. बापूंना वाटले की, येथे शेळीचे दूध वगैरे कोठून असणार? परंतु त्यांनी आधी विचारले नाही. जेवणाची वेळ झाली. तिकडे जयजयकार होत होता. बापू पानावर बसले. मीराबेन बसल्या. इतर मंडळी बसली. बापूंचे जेवण संपत आले. मीराबेन कोबीचीच उकडलेली भाजी खात. बापू उठणार इतक्यात यजमानीणबाई आली आणि ती म्हणाली :

‘महात्माजी, थांबा, हे शेळीचं दूध आणलं आहे.’

‘शेळीचं?’

‘हो; चार दिवसांपासून एक शेळी मुद्दाम आणली. तिला चांगलं चागलं खायला घातलं. गाजरं वगैरे, दूध गोड यावं म्हणून. हे दूध सात पदरांतून गाळलं आहे. वाफेवर तापवलं आहे. घ्या.’

‘परंतु माझें पोट तर भरलं.’

‘असं नका करू.’

‘मीराबेनना द्या.’

‘बापू, माझंही पोट भरलं आहे.’

गांधीजींनी मीराबेनना खूण केली. यांना किती वाईट वाटेल, असा भाव त्यांच्या दृष्टीत होता.

‘बरं आणा’ मीराबेन म्हणाल्या.

‘घ्या तुम्ही तरी घ्या. ते महात्माजींनाच पोचेल. तुम्ही सारी एकच.’

मीराबेननी पेला रिकामा केला. मंदस्मित करीत त्या म्हणाल्या,

‘बापू, खरचं अमृतासारखं होतं ते दूध.’

‘तुझ्या नशिबी होतं, माझ्या नव्हतं.’ बापू मोठ्यानं हसून म्हणाले.

सर्वांना आनंद झाला.


« PreviousChapter ListNext »