Bookstruck

बापूजींच्या गोड गोष्टी 59

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

६१

जगात केवळ निर्दोष असे काय आहे? भल्याबु-याचे सर्वत्र मिश्रण आहे. आपण चांगल्याकडे बघावे. वाईटाकडे दुर्लक्ष करावे. गांधीजींच्याजवळ तीन माकडी बाहुल्या होत्या. एक माकड कानावर हात ठेवणारे, एक डोळ्यांवर हात ठेवणारे, एक ओठांवर हात ठेवणारे. वाईट ऐकू नको, वाईट पाहू नको, वाईट बोलू नको,- असे ती तीन चिनी माकडे सांगतात. महात्माजींचा हा आदर्श होता.

एकदा सरदार सेवाग्रामला आले होते. ‘लॉर्ड लिनलिथगो यांनी आपल्या भाषणाची एक प्रत आगाऊ तुमच्याकडं पाठवली होती असं वृत्तपत्रं म्हणतात. कशासाठी त्यांनी ती प्रत पाठवली होती? तुम्ही काही सूचना कराव्या, फेरफार सुचवावे म्हणून का?’ सरदारांनी बापूंना विचारले.

‘लिनलिथगोंचे ते भाषण म्हणजे खोट्याची खमंग काकडी आहे. त्यात फेरफार करायची, सूचना करायची सोयच नाही. ते भाषण एकदम फेकून देण्याच्या लायकीचं आहे.’ महात्माजी म्हणाले.

‘परंतु सर्व देवांना संतुष्ट करण्याची तुमची हातोटी और आहे.’ सरदार हसून म्हणाले. पुन्हा म्हणाले, ‘व्हाइसरॉयांच्या भाषणाबद्दल ज्या लेखात तुम्ही एक-दोन भले शब्द वापरले आहेत, त्याच लेखात जयप्रकाश आणि समाजवाद यांच्याबद्दलही चांगले उद्गार तुम्ही काढले आहेत.’

गांधीजी हसून म्हणाले, ‘हो. असं आहे खरं. माझ्या आईची ही शिकवण आहे. ती मला वैष्णव मंदिरात जायला सांगे, शंकराच्याही देवळात जायला सांगे, आणि गंमत सांगू का?-आमचं जेव्हा लग्न लागलं तेव्हा आम्हा दोघांना सर्व हिंदू मंदिरातीलच देवांच्या पूजेला नेण्यात आलं असं नाही, तर दर्ग्याच्या पूजेलाही आम्हांला नेण्यात आलं होतं.’

« PreviousChapter ListNext »