Bookstruck

बापूजींच्या गोड गोष्टी 67

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

६९

१९२६ मधील ती गोष्ट. साबरमतीच्या आश्रमात बापूजी होते; आणि भारताचे ते थोर सेवक, दीनबंधू अ‍ॅण्ड्र्यूज तेही त्या वेळेस तेथे होते. दीनबंधूंचे हृदय खरोखर दयासिंधू होते. दुस-याचे दु:ख पाहताच त्यांचे डोळे भरून यायचे. गांधीजीही प्रेमसागर. परंतु प्रसंगी ते कर्तव्यनिष्ठुर होत. कधी कधी कठोपणे दिलेल्या नकारातच अपरंपार करुणा असते.

एकदा मलबारकडील एका काँग्रेस कमिटीचा चिटणीस बापूंकडे आला. त्याची कहाणी मोठी दु:खद होती. त्याने सार्वजनिक फंडातून बरेचसे पैसे लोकसेवेत खर्च केले. परंतु हिशेब न ठेवल्यामुळे त्याला सारा जमाखर्च नीट मांडता येईना. हजार एक रुपयांची गोष्ट. त्याने स्वत:साठी तर पैही खर्च केली नव्हती. परंतु स्थानिक कार्यकारिणीचे लोक म्हणाले,

‘जमाखर्च मांडा. नाहीतर पैसे भरा.’

‘एवढी रक्कम मी कुठून देऊ?’

‘आम्ही काय सांगणार? सार्वजनिक पैशाचा हिशोब चोख हवा.’

‘मी बापूंकडे जातो. त्यांनी जर सूट दिली तर मानाल ना?’

‘हो, मानू.’

आणि तो चिटणीस बापूजींकडे आला. त्याने सारी हकीकत सांगितली. तो म्हणाला :

‘बापू, मी शाळेची नोकरी सोडून सेवेला वाहून घेतलं. मी एक पैही स्वत:साठी वापरली नाही.’

‘ते खरं असेल. परंतु तुम्ही पैसे भरले पाहिजेत. सार्वजनिक कार्यात व्यवस्थितपणा हवा.’

‘परंतु आता मार्ग काय?’

‘मार्ग एकच. पैसे भरण्याचा.’

तो तरुण रडू लागला. जवळच दीनबंधू होते. ते कळवळले.

‘बापू, पश्चात्ताप झालेल्या माणसाला असं कठोर नका बोलू.’ ते म्हणाले.

‘त्याला पश्चात्ताप नुसता मनात होऊन काय उपयोग? झालेली चूक निस्तरली तरच तो खरा पश्चात्ताप असं म्हणता येईल. ते काही नाही. ता तरुणानं स्वत:ची चूक सुधारली पाहिजे. जनसेवक आहे तो.’

« PreviousChapter ListNext »