Bookstruck

बापूजींच्या गोड गोष्टी 69

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

७१

१९३० साली महात्माजी सत्याग्रह सुरू करणार होते. कशाचा सत्याग्रह करणार ते अजून त्यांनी निश्चित केले नव्हते. रवींद्रनाथ त्या ३० सालच्या आरंभी साबरमती आश्रमात आले होते.

‘महात्माजी, सत्याग्रह कोणत्या स्वरुपाचा करणार?’ त्यांनी विचारले.

‘मी रात्रंदिवस विचार करीत आहे. अजून प्रकाश नाही मिळाला.’ बापू म्हणाले. आणि पुढे बापूंच्या डोळ्यांसमोर मीठ आले. दादाभाई नौरोजींनी ५० वर्षांपूर्वी लिहून ठेवले होते की, जर मिठाच्या बाबतीतील अन्याय जनतेस कळेल तर ती बंड करून उठेल. मीठ तयार करण्याला जो खर्च येतो त्याच्या शेकडो पट त्याच्यावर सरकारचा कर. बंगालमध्ये विलायती मीठ बाजारात. मद्रास इलाख्यातील मिठागरे नष्ट झाली. मद्रास प्रांतात खूप गरिबी. समुद्रकाठच्या लोकांना मीठ घ्यायलाही दिडकी नसे. परंतु पोटात मीठ नाही गेले तर कसे व्हायचे! गुरांच्या अंबोणीतही आपण मीठ घालतो. मद्रासकडे आपले गरीब बंधू रात्रीच्या वेळेस समुद्रकाठी जाऊन मिठाचा अंश पोटात जावा म्हणून जमीन चाटीत. समुद्राकाठी आपोआप तयार होणारे मीठ मातीत मिसळण्यासाठी ब्रिटिश सरकारने नोकर ठेवले होते. अन्नात माती कालवणे हे केवढे पाप!

अशा या मिठाकडे राष्ट्रपित्याची दृष्टी गेली. मिठाचा सत्याग्रह हा शब्द हिंदुस्थानभर गेला. सत्याग्रहाचा नवीन शब्द, कायदेभंगाचा नवीन शब्द चुलीजवळ गेला. मायभगिनी सत्याग्रह करायला निघाल्या.

३० सालचा तो लढा अपूर्व झाला. मिठाचा सत्याग्रह, जंगल सत्याग्रह, करबंदी- अशा रीतीने लढा वाढत गेला. परंतु सर्वात बहार केली वानरसेनेने. हिंदुस्थानभरची मुले मुली राष्ट्रीय लढ्यात सामील झाली. सकाळ-संध्याकाळ राष्ट्रीय गाणी म्हणत हिंदुस्थानभर बाल-बालिकांच्या सेना फिरू लागल्या. रामाचे वानर, शिवबाचे मावळे, तसे बापूंचे ते बाळ. सर्व राष्ट्राला या तेजस्वी मुलांनी देशभक्तीची दीक्षा दिली. लहान मुलांनी लाठ्या खाल्ल्या. कल्याणला आठ वर्षांची एक मुलगी लाठीमाराने बेशुद्ध होऊन पडली.

बापू सुटले, सत्याग्रह थांबला. ते उचंबळून म्हणाले, ‘ईश्वरावर विसंबून मी चळवळ सुरू केली होती. परंतु लहान मुलं अशी उठतील, वानरसेना देशभर उभ्या राहतील, याची मला कल्पनाही नव्हती. लहान मुलांची निष्पाप साधना, तिच्यात अपार सामर्थ्य असते. प्रभूची कृपा. त्यांच्याच हाती ही चळवळ होती. त्यानेच सर्वांना प्रेरणा दिली.’

« PreviousChapter ListNext »