Bookstruck

बापूजींच्या गोड गोष्टी 76

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

७८

१९३० मधील ते तेजस्वी दिवस. अजून सत्याग्रह सुरू झाला नव्हता. अजून ती महान दांडी-यात्रा सुरू झाली नव्हती. देशात सर्वत्र अपेक्षेचे वातावरण होते. २६ जानेवारीचा पहिला स्वातंत्र्यदिन देशभर पाळला गेला होता. गांधीजी कोणती आज्ञा करतात, कशा रीतीने सत्याग्रह करा सांगतात, इकडे जनतेचे लक्ष होते. ठायी ठायी शिबिरे सुरू झाली होती. स्वयंसेवक येऊ लागले होते. मिठाचा सत्याग्रह देशभर करायचा, परंतु मी सांगितल्याशिवाय नाही करायचा. आधी दांडीला तो मी करीन, मग सर्वत्र करा, असे गांधीजींनी सांगितले होते.

महात्माजी एक महत्त्वाचे पत्र लिहीत आहेत. ऐतिहासिक पत्र. कोणाला लिहित होते ते पत्र? दिल्लीच्या लाटसाहेबांना, व्हाइसरॉय साहेबांना.

ते पत्र लिहून झाले आणि लगेच दुसरे एक पत्र त्यांनी लिहायला घेतले! ते कोणाला होते? इंग्लंडमधील मुख्य प्रधानाला? अमेरिकेच्या अध्यक्षाला? कोणाला होते ते? त्या वेळच्या काँग्रेसच्या अध्यक्षांना, पंडित जवाहरलाल नेहरूंना? की सत्याग्रहाचा मार्ग सापडला का, असे नुकतेच आश्रमात येऊन विचारून गेलेल्या रवींद्रनाथांना? कोणाला होते ते पत्र?

ते पत्र एका हरिजन मुलीला होते. ५०० मैल दूर ती राहत होती. तिला होते ते प्रेमळ पत्र.

‘तुझं बोट दुखावलं आहे, परंतु त्याला आयडिन लावतेस का? ते लावीत जा.’ अशी वत्सल सूचना राष्ट्रपिता त्या मुलीला त्या पत्रातून देत होता. एकीकडे राष्ट्रव्यापी लढा डोळ्यांसमोर, ते व्हाइसरॉयना पत्र, तर दुसरीकडे त्या दूरच्या मुलीला ते प्रेमळ पत्र. महापुरुषांना सारेच सारखे.

« PreviousChapter ListNext »