Bookstruck

बापूजींच्या गोड गोष्टी 99

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

१०९

महात्माजी स्वाक्षरीचे कमीत कमी पाच रुपये घेत. परंतु कधीकधी ते गंमत करीत. एकदा एक अमेरिकन गृहस्थ स्वाक्षरीसाठी महात्माजींकडे आला.

‘तुमच्याजवळ किती पैसे आहेत?’ महात्माजींनी विचारले. त्याने आपले पाकीट खिशातून बाहेर काढले. त्याने पैसे मोजले. ३१० रुपये भरले. महात्माजींनी त्याचे पाकीट हातात घेतले व त्यातील पैसे घेऊन त्यांनी रिकामे पाकीट परत केले. स्वाक्षरी दिली.

परंतु तो अमेरिकन गृहस्थ गोंधळल्यासारखा दिसला. महात्माजी हसून म्हणाले;

‘क्या हुआ?’

‘गांधीजी, मला बोटीपर्यंत जायला आगगडीचं भाडं हवं. मजजवळ तर आता काही नाही.’

‘ठीक. आपण हिशोब करू या.’ गांधीजी म्हणाले. भाडे, हॉटेलमध्ये राहण्याचा खर्च वगैरे सारे हिशेब करण्यात आला, तर ३१० रुपये झाले. गांधीजींनी सारे पैसे परत दिले!

११०

आश्रमात डासांचा फार त्रास होत होता. महात्माजींना झोप नीट यायची नाही. ते कोणाजवळ म्हणाले; ‘या डासांना काय करावं? रात्री फार त्रास होतो.’

‘तुम्ही मच्छरदाणी वापरा. सोपा उपाय’ ते मित्र म्हणाले. गांधीजी विचारमग्न दिसले व नंतर म्हणाले;

‘मच्छरदाणीचा उपाय मला माहीत आहे. परंतु हिंदुस्थानात किती लोक मच्छरदाणी वापरू शकतील? जिथं खायला दोन घास मिळत नाहीत तिथं मच्छरदाणी कोण घेणार? हिवतापानं लाखो लोक देशात मरत आहेत. लाखो खेड्यांत गरीब बंधू तापानं त्रस्त आहेत. त्या सर्वांना शक्य होईल असा कोणता इलाज?’

पुढे बापूंना कोणी सांगितले की रॉकेलचा हात अंगाला चोळून निजावे. डास मग जवळ येत नाहीत. गांधीजींना आनंद झाला आणि रॉकेलचा हात अंगावरून फिरवून मग ते झोपू लागले.

« PreviousChapter ListNext »