Bookstruck

महात्मा गांधींचें दर्शन 3

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

नकोस, जी काही हिंसा होईल ती अपरिहार्य समजून वाग असे सांगून प्रवृत्त केले आहे. राजे लोकांना वाटे की यतिधर्म श्रेष्ठ आहे. आमच्या राजधर्मांत हिंसा, अन्याय, अप्रामाणिकपणा पदोपदी येतात. प्रसंगी कठोर व्हावे लागते, शासन करावे लागते, सत्य मोडावे लागते, दंभ दाखवावा लागतो. हा राजधर्म पापमूलक आहे. नकोच हा असे म्हणून काही राजे खरोखरच निवृत्त होऊ पाहात होते. तुकाराम महाराजांनी त्यांना सांगितले,''तू समर्थांकडे जा.'' शिवाजी महाराज समर्थांकडे गेले. समर्थांनी सांगितले,''शिवबा, लोकसंग्रह व समाजधारणा यासाठी स्वधर्म सोडून जाऊ नका. जी काही कठोरता तुमच्या धर्मांत येईल ती अपरिहार्य समजा.'' असा उपदेश आजपर्यंत सारे करीत आले. राजकारणांत हिंसा, असत्य असणारच; अपरिहार्य आहेत या गोष्टी. अनासक्तबुध्दीने त्या गोष्टी कराव्या असे सांगत. लोकमान्य टिळकही असेच सांगतात.

वास्तविक धर्माला असा उपदेश करावा लागतो की संसारात फार नका रमू. परमार्थाकडे लक्ष द्या. नेहमी धर्मग्रंथातील संवादांतून पूर्वपक्षी हा संसाराची बाजू घेणारा असतो आणि त्याला उत्तर देणारा उत्तरपक्षी हा परमार्थाचा उपदेश करीत असतो. परंतु आपणांस गीतेत निराळाच देखावा दिसतो. येथे अर्जुन निवृत्त होऊ पाहात आहे. परमार्थाकडे जाऊ पाहात आहे, तर गीता त्याला निवृत्त न होऊ देता कर्मप्रवृत्त करीत आहे. गीता संन्यासमार्गी आहे, सर्व संसार सोडून जाऊ पाहणा-यांस कर्मप्रवृत्त करणारी आहे. निवृत्तिधर्मीयांस प्रवृत्तीच्या पक्षाच्या बाजूने उत्तर देणारी म्हणून गीता आहे, असे आपण मानीत आलो ते काही खोटे नाही. परंतु महात्मा गांधींनी जी भूमिका घेतली आहे, ती प्रवृत्तीची असली तरी गीतेहून निराळी आहे. ते आपल्या भूमिकेवरून एक निराळीच दृष्टि देत आहेत. राजकारणांत हिंसा आहे वगैरे शंका घेणा-यांस महात्माजी असे नाही उत्तर देत की अपरिहार्य समजून अनासक्त राहून ती हिंसा तू कर. ते निराळयाच रीतीने शंका निरसन करू पाहतात. राजकारण, व्यवहार वगैरेंत पूर्वजांनी ज्या मर्यादा घातल्या आहेत, त्या सोडून पुढे जाण्याचा काळ आला आहे. पूर्वीच्या धर्मसंस्थापकांनी, यतिमुनींनी ज्या मर्यादा सांगितल्या, ज्या अनुज्ञा सांगितल्या, त्या आवश्यक नसून क्षम्य आहेत. राजाने हिंसा केलीच पाहिजे असा त्याचा अर्थ नसून त्याने हिंसा केली तर ती क्षम्य आहे असा अर्थ आहे. परंतु क्षम्य म्हणून Permissible म्हणून जी गोष्ट सांगितली ती कर्तव्य नाही ठरत. आपधर्म म्हणून ती आहे. ती गोष्ट Obligatory केलीच पाहिजे अशी नाही. कर्तव्ये व्यवहारात आणताना अपरिहार्य म्हणून त्यांनी काही अनुज्ञा दिल्या. परंतु शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपणांस आपला व्यवहार दिवसेंदिवस अधिक उच्च पातळीवर न्यावयाचा आहे. व्यवहार व्यवहार असे म्हणत बसून कर्तव्ये खाली ओढायची नाहीत. महात्मा गांधी भगवद्गीतेकडे या दृष्टीने पाहतात. या दृष्टीने तिचे विवेचन करू पाहतात. राजकारणांत ज्या गोष्टी नडत आहेत, अडत आहेत, त्यांच्या निराकरणार्थ मी झटतो आहे असे त्यांनी अनेक वेळा सांगितले आहे. महात्मा गांधींची जी राजकीय भूमिका आहे ती पूर्वी कोणीही घेतलेली नाही. पूर्वी म्हणत राजकारण करा. ते करताना जी हिंसा वगैरे करावी लागेल ती निर्वैर बुध्दीने, अनासक्त रीतीने करा. पूर्वीच्या लोकांनी अहिंसा, सत्य इत्यादि तत्त्वांचाहि जणू श्रमविभाग केला. बुध्द, ख्रिस्त, महावीर यांनीच यति धर्मांत संपूर्ण अहिंसा आणली.

« PreviousChapter ListNext »