Bookstruck

महात्मा गांधींचें दर्शन 7

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

वास्तविक स्वराज्याचा लढा हा पोटापाण्याचा आहे. घरदार मिळावे, संततिसंपत्ति  लाभावी, संसार सुखाचा व्हावा म्हणून स्वराज्य आहे. स्वराज्याचा लढा हा काही आपण सारे मोक्षासाठी नाही करीत. भौतिक कारणासाठी हा लढा आहे. परंतु महात्माजींच्या नेतृत्वाखाली चाललेला हा झगडा भौतिक कारणासाठी असला तरी तो मोक्षाच्या विरुध्द नाही. स्वराज्याचा हा लढा त्यांनी मोक्षाचाहि केला आहे. हा स्वातंत्र्याचा लढा मोक्षाविरुध्द मार्गाने चालू नये असे त्यांचे म्हणणे आहे. त्यांना सांसारिक सुखाची लालसा नाही. संतति, संपत्ति इत्यादींचा त्यांनी होम केला आहे. काही पाश त्यांनी ठेविले नाहीत..

''संसारासी आग लावूनिया हाते
मागुतें परौतें पाहू नये''

असे त्यांनी केले आहे. संतति संपत्तीचा मोह नसताहि ते या स्वातंत्र्याच्या लढयांत का सामील झाले? लढयात भगवद्गीतेंत अहिंसा मानत असले तरी अहिंसेसाठी तिचा अवतार आहे असे तेहि मानीत नाहीत. अनासक्त रीतीने युध्द करावे असे गीता सांगते. त्या साठी एक भौतिक युध्द भगवद्गीता दृष्टांतासाठी घेते. अनासक्त रीतीने कोणताहि व्यवहार करावा लागला तरी ते पाप नाही असे गीता सांगते आणि अर्जुनास युध्दार्थ प्रवृत्त करिते.

परंतु आज युध्दाचा व्यवहार निराळया रीतीने करण्याची वेळ आली आहे. महात्माजीहि 'मी युध्द करतो, मी बंड पुकारतो' असेच शब्द वापरतात. 'मी क्रांन्ति करतो, झगडा करतो' असे ते म्हणतात. महात्माजींनी युध्दाचा अर्थ व्यापक केला आहे. त्यांचे हे शब्द बाह्यार्थाने घेऊन पुष्कळजण त्यांच्याविषयी गैरसमज फैलावित असतात. ''अत्याचारांची काँग्रेसवरील जबाबदारी'' या सरकारी चोपडयांत महात्माजींच्या शब्दांचा असाच दुरुपयोग करण्यांत आलेला आहे. महात्माजी युध्द, बंड, वगैरे जुनेच शब्द वापरतात. परंतु त्यांत ते नवीन अर्थ ओतीत असतात. त्यांचा भावार्थ निराळा असतो. सरकारने महात्माजींच्या शब्दांचा विपर्यास केला आहे. महात्माजींच्या मनांतील जो अर्थ तो मुद्दाम दडपून टाकला आहे. मी शब्दांचे अर्थ बदलणार आहे असे त्यांनी स्पष्टपणे अनेकदा सांगितले आहे. शब्दांचा नवीन अर्थ करायला मी भगवद्गीतेपासूनच शिकलो असे ते म्हणतात. यज्ञ या शब्दाचा अर्थ भगवद्गीतेने बदलला आहे. ज्ञानयज्ञाची भव्य कल्पना गीतेने दिली आहे. यज्ञ शब्दांतील अर्थाचा भगवद्गीतेने विस्तार केले आहे. आत्मा, ज्ञानप्राप्ति, मोक्ष, वगैरे शब्द पूर्वीचेच रूढ झालेले, परंतु त्या रूढ शब्दांत नवीन अर्थ ओतता येतो.

महात्माजी म्हणतात, ''मीहि  युध्द करीत आहे. आपणांवर अन्याय होत असेल तर त्याच्या निवारणार्थ युध्द केलेच पाहिजे.'' परंतु हे युध्द म्हणजे शस्त्रास्त्रांचेंच, हिंसेचेच असेल किंवा असले पाहिजे असे नाही. युध्द या शब्दांतील मुख्य भावना कोणती? प्रतिकार करावा, हक्कांचे संरक्षण करावे, ही भावना आहे. प्रतिकार करण्याचा दुसरा एखादा नवीन प्रकार मी शोधून काढला तर ते युध्दच आहे. आणि हा प्रतिकाराचा मार्ग अमान्य होण्याचे कारण नाही. भगवंतांनी यज्ञाचा अर्थ बदलला. महात्माजी म्हणतात मी युध्दाचा अर्थ बदलतो. हिंसात्मक युध्दाने जी गोष्ट आपण साधू पाहतो त्यापेक्षा माझ्या अहिंसात्मक युध्दाने ती अधिकच साध्य होईल. जी गोष्ट युध्दाच्या साधनाने आपण मिळवू पाहतो, ती वास्तविक आपणांस मिळतच नसते. तात्पुरता विजय वाटला, ध्येय मिळाले असे वाटले, तरी मागून भ्रमाचा निरास होतो.

« PreviousChapter ListNext »