Bookstruck

महात्मा गांधींचें दर्शन 26

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

असंग्रहाचें तत्त्व

असंग्रहासंबंधी लिहितांना ते म्हणतात : ''असंग्रहाचें तत्त्व अमलांत आणण्याचा प्रयोग सक्तीनें करतां येईल असें मला वाटत नाही.'' कारण सक्तींत हिंसा येणार. हिंसा तर गांधीजींना अमान्य. ''आपल्या देशाचें भवितव्य'' या लेखांत ते म्हणतात : ''बोल्शेव्हिझम मला मान्य नाहीं. खाजगी मालमत्ता सक्तीनें नष्ट करणें मला मान्य नाहीं. मला अर्थशास्त्रांत असंग्रहाचें नैतिक तत्त्व दाखल करायचें आहे. लोकांना हें सुंदर तत्त्व अहिंसेच्या मार्गानें, शान्तीच्या मार्गानें पटवता आलें तर किती छान होईल ! परंतु सक्तीनें सामुदायिक मालकी प्रस्थापूं पहाल तर ती टिकणार नाही. कारण हिंसेवर आधारलेलें कांहीच टिकत नसतें. तें तात्पुरतें असतें. राज्यसंस्थेला सक्तीने सारें करण्यांत चिरस्थायीं यश येणें अशक्य आहे. म्हणून शान्तीच्या मार्गानेंच असंग्रह येऊं दे. जे कोणी त्याग करतील, त्यांची उदाहरणें स्फूर्ति देतील. त्या थोडया महाभागांची ध्येयशक्ति वायां जाणार नाहीं. अशा मार्गानें जाण्यांत हिंसा कमी होईल. ''हिंसेनें झटपट करूं पाहणें गांधीजींना पसंत नाही. असंग्रहाचें तत्त्व समाजांत मान्य झाल्याशिवाय समाजांत अहिंसा कधींच येणार नाहीं. परंतु हा असंग्रह कसा यायचा, कसा आणायचा?

महात्माजींचा मधला मार्ग

एकवर्ग समाज निर्मिणें आणि कष्टाशिवाय कोणीं खाऊं नये हीं दोन तत्त्वें घेऊन महात्माजी अहिंसक लोकशाही उभारूं पाहतात. सारी संपत्ति श्रमांतूनच निर्माण होते. ती एकानें बळकावणें पाप आहे. खर्‍या लोकशाहींत मतस्वातंत्र्य, विचारप्रसारस्वातंत्र्य, याबरोबरच असंग्रहाचें सार्वभौम तत्त्व हवें. अशी लोकशाही आज आहे कोठें? ती निर्मायची आहे. आजची राज्यसंस्था लोकशाही दिसली तरी ती भांडवलशाही आहे. भांडवलशाही  लोकसत्ता अहिंसक राहूं शकत नाहीं. समाज सुखी करण्यासाठीं आर्थिक घटना बदलायला हवी.

आर्थिक घटना

समाजांत दोन मर्यादा आधीं घालायला हव्यात. गरिबी कोठवर सहन करावी? या इतपत गरिबी असली तरी चालेल, परंतु याच्याखालीं तरी ती जातां कामा नये, अशी एक मर्यादा हवी. त्याचप्रमाणें जास्तींत जास्त श्रीमंती किती असावी याचीहि एक मर्यादा हवी. त्या मर्यादेच्या पलीकडे श्रीमंती गेली तर तें पाप होय, गुन्हा होय असें झालें पाहिजे. अशा या दोन मर्यादांच्या आंत सार्‍या समाजानें नांदावें. खालची मर्यादा नि वरची मर्यादा यांच्या चौकटींत समाज बसवावा.

प्रायोगिक कल्पना

समजा, पांच माणसांचें एक कुटुंब आहे. पति, पत्नी, तीन मुले. या सर्वांनी किती काम करावें, त्यांना मोबदला किती मिळावा? कामाचीहि मर्यादा हवी. इतक्या तासांच्या वर काम कोणासच नसावें. सुटी सोडून पुरुषांस रोज सोडेसाहा तास काम असावें. सुटी धरून समजा आठ तास. स्त्रियांना सुटी सोडून चार तास, सुटी धरून पांच तास. स्त्रियांना गृहकृत्यांत लक्ष देतां यावें म्हणून त्यांना कमी काम असावें. आठ ते सोळा वर्षांपर्यंतच्या मुलांनी रोज एक तास उत्पादन काम करावें. मी मोठा होईन, मग काम करीन असें नको. प्रत्येकानें कांही तरी उत्पादन काम रोज केलेंच पाहिजे.

« PreviousChapter ListNext »