Bookstruck

महात्मा गांधींचें दर्शन 31

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

सत्यसंशोधनाच्या मार्गांत खरें काय, खोटें काय, त्याचप्रमाणें सत्य काय, असत्य काय यांचाहि विचार येतो. आपण सत्याग्रह करतों. समाजांतील वस्तुस्थितीचें सत्यस्वरूप समजून घेऊन तेथें अन्याय दिसतो म्हणून आपण सत्याग्रह करतों. न्याय काय, अन्याय काय, याचीहि स्पष्ट जाणीव आपणांस लागते. काय आहे एवढें जाणून भागत नाही, तर काय असावें याचीहि जाणीव असायला हवी. परंतु आदर्शस्थिति कशी असावी हें कळायला अंतःशुध्दिहि लागते. काय आहे हें समजायला आणि कसें असावें हेंहि समजायला अंतःकरण शुध्द असावें लागतें. कारण जें खरोखर समोर आहे तेंहि विकृत दिसूं नये म्हणून दृष्टि निर्मळ हवी. मलिन मनाला शुध्द वस्तुस्थितिहि विकृत दिसते. बुध्दीचा आग्रह आला, विशिष्ट दृष्टीनेंच आपण पाहूं लागलों की सारें निराळेंच दिसणार. अमुक अमुक असें आहे, तें असेंच असणार, असा पूर्वग्रह धरून जेव्हां मनुष्य पाहूं लागतो, तेव्हां त्याला वस्तुस्थिति विपरीतच दिसणार. जशी दृष्टि तशी सृष्टि. सत्याचें आकलन व्हायला मन पूर्वग्रहरहित हवें. गढून पाण्यांत सूर्याचें प्रतिबिंब पडत नाही, त्याप्रमाणें पूर्वग्रहांनीं विकृत नि बरबटलेल्या बुध्दींत सत्याचें प्रतिबिंब कसें पडणार? वस्तुस्थितीचें स्वरूप समजायलाहि शुध्द मन हवें. मन धुवून काढलें पाहिजे पाटीवर अक्षर उमटावें म्हणून आपण ती स्वच्छ करतों, त्याप्रमाणें सत्याचा साक्षात्कार व्हावा, सत्य हृदयपटलावर लिहिलें जावें  म्हणून हृदय घांसून पुसून स्वच्छ केलेलें असायला हवें. प्रत्येक व्यक्ति पूर्वग्रहाच्या चष्म्यांतूनच पाहाते. त्यामुळें सत्य शुध्द स्वरूपांत न दिसतां शबल दिसतें, विकृत दिसतें काय आहे हे कळायलाहि जर शुध्द बुध्दीची, निरंजन बुध्दीची आवश्यकता आहे, परिस्थितीचें सम्यक् दर्शन होण्यासाठींहि जर बुध्दि निर्मळ हवी, तर मग काय असावें, आदर्श काय याचें ज्ञान व्हायला तर अधिकच शुध्दता हवी. ज्या मानानें बुध्दि शुध्द असेल, त्या मानानें सत्याचें निर्मळ दर्शन घडेल. तुम्ही ज्या मानानें सत् त्या मानानें तुम्हांस सत् कळेल, समजेल, सत्याचे दर्शन होईल. तुम्ही जितके असत्य असाल, तितके सत्यापासून, सत्य काय याच्या ज्ञानापासून दूर जाल. महात्माजी  म्हणून आत्मशुध्दीवर जोर देतात. सत्याग्रही सत्यासाठीं उभा राहतो. परिस्थितीचें सत्य स्वरूप आणि आदर्शाचें सत्य स्वरूप.

''सत्येन सिध्दिरात्मनः''

सत्यानेंच सिध्दि प्राप्त होते. या सत्यांत बाह्यज्ञानाबरोबर आत्मज्ञानाचाहि अन्तर्भाव असतो. हाच मोक्षाचा मार्ग. मायेंतून पाहतो तोच खरा पाहणारा. त्याप्रमाणें परिस्थितीवरचे पडदे फाडून तिचेंहि सत्य ज्ञान जो करून घेतो आणि मनोबुध्दीवरचीं मलिन पुटें काढून जो स्वतःचेंहि स्वरूप समजून घेतो तोच मोक्षपदीं आरूढ होतो.

« PreviousChapter ListNext »