Bookstruck

महात्मा गांधींचें दर्शन 41

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

आसक्त मनुष्याला योग्यायोग्य कळेनासें होतें. सदसताचें भानच त्याला उरत नाहीं. परिणामविषयीं मनुष्य अतिशय आतुर नि उत्सुक झाला म्हणजे जें मिळेल साधन तें तो उचलतो. साधनांचा विवेक तेथें राहात नाही. परिणाम कोठुनहि लौकर यावा एवढीच त्याच्याजवळ दृष्टि असते. त्यासाठी हीन साधनेंहि तो वापरील. हीन साधनांनी चांगला परिणाम होणार नाहीं, ही गोष्ट माणसाला कळायला हवी फलाचा सारखा ध्यास घेऊन मनुष्य रजोगुणी बनतो. चावूं की खाऊं अशी त्याची वृत्ति होते. 'अयथावत् प्रजानीति' नीट न कळणारी अशी त्याची बुध्दि होते. मनुष्यानें कर्तव्यकर्म फलासक्ति नि विषयासक्ति दोन्ही सोडून करावें. त्याला फल मिळणार नाहीं असे नाहीं. फल मिळतेंच. अनासक्त राहून कर्म करूं तर फल मिळणारच नाहीं, असा भ्रम कोणी निर्माण करतात. परंतु तसें नाहीं. गीतेंत अशा अर्थाला जागा नाहीं. फलाची आसक्ति न ठेवून कर्म करणारास उलट सहस्त्रपट फल मिळतें. त्याच्या उद्योगाचा, अहर्निश कर्माचा कां परिणाम होणार नाही? परिणाम होणारच. फलासक्ति राखूं तर साधनशुध्दि रहात नाही. मग मनुष्य मिळेल तें साधन, मलिन, हीन, घाणेरडें, ओंगळहि वापरतो. खरें म्हणजे बुध्दीचा एकदां स्थिर निश्चय झाला कीं मग त्या निश्चित साधनेंतच माणसानें तन्मय होऊन गेलें पाहिजे. साधन बरोबर असेल तर फल मिळालेंच पाहिजे. सृष्टीची ही सहज नियति आहे. सृष्टीच्या नियतीवर विश्वसून साधनेंत रमा. फळ मिळेल. मिळेलच. फळ न मिळालें तर त्याला दुसरी कारणें असतील. परंतु तुम्ही फलासंबंधी अनासक्त होतात म्हणून फल मिळालें नाही असें नका म्हणूं. शुध्द साधनांनी फल मिळेल हा विश्वास बाळगा. अशुध्द साधनें कदापीहि हातीं घेऊ नका. हिंसेतून चांगला परिणाम कधींहि येऊं शकणार नाहीं. आपण हिंसाप्रवृत्त होतों याचें कारण फल लौकर मिळावें अशी आसक्ति असते. आसक्तीशिवाय मनुष्य हिंसादि साधनांचा उपयोग करण्याकडे वळणार नाही. अनासक्ति घ्याल तर हिंसाहि आपोआप दूर सरेल. आसक्तीच्या भरांतच मनुष्य हिंसा करतो. हिंसेला स्वतःचे वाईट परिणाम तत्क्षणीं दिसत नाहींत. पूर्ण अनासक्त मनुष्य हिंसा करूं शकत नाहीं.

नैतिक नियति, भौतिक नियति

नियति म्हणजे कायदा; भौतिक नियति आहे, त्याप्रमाणेंच नैतिक नियतिहि आहे. भौतिक नियतींत ज्याप्रमाणें इतके भाग ऑक्सिजनचे, इतके भाग हैड्रोजनचे मिसळले म्हणजे पाणी होतें याविषयीं शंका नसते, त्याप्रमाणें प्रेमानें प्रेम मिळूं शकतें, द्वेषानें द्वेष, हा नैतिक सृष्टींतील नियम आहे. भौतिक नियतीचे नियम ज्याप्रमाणें बुध्दीस पटतात, अनुभवास पटतात, त्याप्रमाणेंच नैतिक नियमहि बुध्दीला, अनुभवाला पटणारेच असतात. ज्याला प्रेमाचें साम्राज्य सर्वत्र पसरावयाचें आहें, त्याला द्वेषाचे साधन कसें उपयोगांत आणतां येईल? प्रेमाचें बी पेरूनच प्रेमाचें पीक येण्याचा संभव. द्वेषानें प्रेम पिकणें कधींच शक्य नाहीं. कांटे पेराल तर कांटे खाल. मोत्यासारखे दाणे पेराल तर सोन्यासारखें पुष्टि तुष्टि देणारें धान्य मिळेल. सत्यनिष्ठ मनुष्य जेव्हां आत्मशुध्दि करतो तेव्हा त्याचा परिणाम आसपासहि होतो. फुलाचा सुगंध त्याच्यापुरताच रहात नाहीं. त्याची इच्छा असो नसो, तो सुगंध हवेतं दरवळणारच. याच्या उलट सत्यनिष्ठ मनुष्य जर पदच्युत झाला, ध्येयार्थी मनुष्यहि जेव्हा अधःपतित होतो, तेव्हां आसपासचें वातावरणहि कलुषित होतें. म्हणून आसक्तिवश न होतां पूर्ण सत्यनिष्ठ राहणें यांत स्वहित तर आहेच, परंतु समाजशुध्दिहित होते. सत्य आणि अहिंसा यांचे नियम जर आचरणांत आपण आणले नाहीं तर खर्‍या दृष्टींने अनासक्त होतां येणार नाहीं. आणि अनासक्त झाल्याशिवाय सत्य-अहिंसा पूर्णपणें आचरतां येणार नाहींत. अशी महात्माजींची ही मांडणी आहे. म्हणून बुध्दि शुध्द करून मनुष्यानें तिला शरण जावें. त्या शुध्द बुध्दीचा मग आदेश ऐकावा.

« PreviousChapter ListNext »