Bookstruck

महात्मा गांधींचें दर्शन 44

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

नैतिक उन्नतीस उपाय?

परंतु अशी नैतिक उन्नति समाजांतील सर्वांची करायची तर उपाय कोणता? मार्ग कोणता? मनुष्य पापप्रवृत्त कां होतो? याचें कारण सापडलें म्हणजे उपाय सांपडेल. रोगाचें कारण सांपडलें म्हणजे उपाय पाहूं; मग उपचारविचार नीट करतां येईल. मनुष्य पापप्रवृत्त होतो याला दोन कारणें सांगतात. कोणी म्हणतात कीं, परिस्थितीमुळें मनुष्याला पाप करावें लागतें. दुसरे म्हणतात कीं, त्याच्या ठिकाणीं आत्मोन्नतीची भावनाच तितक्या प्रमाणांत जागृत नसते. परंतु या दोन्ही कारणांपैकी कोणतेंहि एक संपूर्णपणें खरें नाही. जगांत असे किती लोक आढळतील कीं, कोणत्याहि परिस्थितींत जे आत्मोन्नतीच करून घेत असतील? एवढी जोरदार प्रबलतम आत्मोन्नतीची प्रेरणा कितीजणांचे ठायीं आढळून येईल? अशीं माणसें दुर्मिळ असतात, अपवादरूप असतात. बुभुक्षित झाल्यावर विश्वामित्रासारखाहि पाप करायला, चोरी करायला तयार होतो. हें दृश्य पाहिलें म्हणजे असें वाटूं लागतें की, विशिष्ट परिस्थितीच माणसाला पापप्रवृत्त करीत असते. आपण पटकन् हे सज्जन, हे दुर्जन अशी वांटणी करून मोकळे होतो. परंतु ज्यांना आपण दुर्जन म्हणतों, चोर म्हणतों, जे तुरुंगात येतात, ते ज्या परिस्थितींत होते, तिच्यांत आपण असतों तर आपण कसें वागले असतो? त्या परिस्थितींत मी असतों तर असाच नसतों का वागलों?

''बुभुक्षितः किं न करोति पापं
क्षीणा नरा निष्करुणा भवन्ति ॥''

भूक पोटांत भडकली म्हणजे मनुष्य चोरी न करील तर काय करील? मनुष्य क्षीण झाला, असमर्थ झाला म्हणजे तो कठोरहि बनतो. दरिद्री माता मुलाला मारते व काम करायला पाठवते. गरीब आई मुलाला नदींत सोडून देते. ते दयेचे पाझर कोठें गेलें? वात्सल्य कां सुकलें? दारिद्य्रामुळें, परिस्थितींमुळे माणसें निर्दय कां होतात, पापी कां होतात याची उपपत्ति येथें आहे. भौतिक परिस्थितीच पापजननी असते. समाजवादी विचारसरणीच्या लोकांनीं या सिध्दान्ताकडे अधिक लक्ष दिलें आहे. दरिद्री लोकांच्या अवस्थेकडे पाहिलें कीं, हे सत्य वाटतें. दरिद्री लोक अधिक पापें करतांना दिसतात. मनुष्य दारिद्य्रानें पापप्रवृत्त होतो ही गोष्ट खरी. परंतु जे श्रीमंत असतात ते तरी पुण्यवंत असतात का? श्रीमंतहि निर्दय असतात. समाज उपाशी असला तरी ते वाटेल तो भाव घेऊन फायदाच बघत असतात. कलकत्त्याला रस्त्यांत लोक मरत होते, बंगालमध्यें लाखों लोक मेले आणि पुंजिपतींनी त्याच काळांत कोटयावधि फायदा करून घेतला.  श्रीमंत माणसें तुरुंगांत जातांना फारशीं दिसत नाहींत, यावरून ते भले आहेत, सद्गुणांचे पुतळे आहेत असें नाहीं. कायदे न मोडतां पाप करण्याची त्यांना पदोपदीं संधि असते. त्यांचें पाप कायद्यांत बसत नाही. असेच कायदे आहेत. चोरी प्रत्यक्ष न करितां अकष्टार्जित धन संपादण्याचा त्यांचा मार्ग निष्कंटक आहे, मोकळा आहे. दुसर्‍यास त्रास देऊन स्वतः वाटेल तितका पैसा मिळवतां येतो असे कायदे आहेत. म्हणून श्रीमंत चोरी करतांना, कायदेशीर चोरी करतांना दिसत नाहीं. तेव्हा श्रीमंत मनुष्य पाप करींत नाहीं असें नाहीं. भौतिक परिस्थिति त्याला अनुकूल तरीहि तो पापीच.

« PreviousChapter ListNext »