Bookstruck

महात्मा गांधींचें दर्शन 52

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

परंतु अशा या व्यवहारांत न्यायबुध्दि नाहीं. मीं जर स्वस्तांत स्वस्त वस्तु घेतली तर ती महागांत महाग करून का विकावी? वस्तु अत्यंत स्वस्त मिळते. कां मिळते? त्याचा तुम्हीं विचार करायला हवा. नाहीं तर घोर पातकें तुम्ही कराल. समजा, एखाद्या गांवाला आग लागली. जळून गेलीं घरेदारें. त्यांचे कोळसे झाले. हे कोळसे स्वस्त म्हणून विकत घेतांना तुम्हांला आनंद वाटेल का? स्वस्तांत स्वस्त बाजारांत विकत घेण्याचा हाच प्रकार आहे. मीं माल खरेदी करून ठेवायचा आणि ज्या लोकांना त्याची जरूर त्यांना ती चौपट पांचपट किमतीस विकायचा हें बरें का? महात्मा गांधी ही वृत्ति कशी सहन करतील? तो सद्व्यवहार नाहीं. मी माझ्या धंद्यानें समाजाची सेवा करीत आहे. ती विशिष्ट सेवा मला करतां यावी म्हणून कांही फायदा मीं घेणें योग्य आहे. जरूर तेवढाच फायदा मीं घ्यावा. समाजानें नियंत्रण घातलें नाही, सरकारनें घातलें नाहीं, तरी आपण होऊनच स्वतःला नियंत्रण घालून घेतलें पाहिजे. वाटेल तितका फायदा घेणें ही आसुरी वृत्ति आहे. स्वस्तांत स्वस्त विकत घेऊन महागांत महाग विकणें हा अन्याय आहे. चरखासंघाची मांडणी करतांना महात्माजींनी सांगितलें होतं की, आठ तास काम करणार्‍यांना पोटभर तरी मजुरी देतां आली पाहिजे. महाराष्ट्रानें हा प्रयोग केला होता. आठ तास सूत कातलें तर चार सहा आणे तरी मजुरी मिळावी. सूत कातणार्‍याला किती मिळतें हा महत्त्वाचा प्रश्न आहे. श्रम करणार्‍याला किती मिळतें याचा विचार न करतां माल निर्माण करणें हें योग्य नाही. श्रम करणार्‍याच्या आवश्यक गरजा भागतात कीं नाहीं हें पाहिलें पाहिजे. महात्माजींच्या प्रयोगांत ही दृष्टि असते. कांही मोठें कारखाने झाले म्हणजे माझ्या देशांतील संपत्ति वाढली असें नाहीं. लाखों खेडीं आहेत. तेथील संपत्ति वाढली का? संपत्तीची विभागणी होत आहे का? का एके ठायीं ढीग आहेत? ज्यानें सेवा केली त्याला संपत्ति मिळते कीं नाहीं हें मी पाहीन असें महात्मा गांधी म्हणतात. मीं ज्याला राबविलें, श्रमविलें  त्याच्या पोटाला काय मिळालें? दुसर्‍यापासून वस्तु विकत घेतांना त्याला कष्ट किती पडले, त्याचा योग्य मोदला त्याला मिळत आहे की नाहीं, त्याच्या आवश्यक गरजा भागतील इतपत त्याला मिळालें तरच तो पुढें काम करूं शकेल, हे सारे विचार  गांधीजींच्या अर्थशास्त्रांत आहेत. हें सारें करून मग थोडी संपत्ति मला मिळाली तरी ती हितावह आहे. ती यज्ञशिष्ट संपत्ति आहे.

कोणीं विचारतात कीं, आजच्या काळीं तुमचा हा स्वदेशीधर्म संकुचित नाहीं का? आपल्या प्रान्ताचा, खेडयाचा विचार करणें संकुचितपणाचें नाहीं का? हे प्रश्न फोल आहेत. जेव्हां आपण दूरचा माल घेतों तेव्हां त्या दूरच्या लोकांसहि खायला मिळावें असा विचार करून का आपण तसें करीत असतो? मुळींच नाही. वस्तु सुबक आहे, स्वस्त आहे, घ्या. हाच विचार मनांत असतो. ज्याचा माल आपण घेतों, त्या माल तयार करणार्‍या श्रमजीवीच्या आवश्यक गरजा भागतात कीं नाहीं हें आपण पाहिलें पाहिजे. तसें करतांना आपलें नुकसान होत असलें तरीहि त्याची भरपाई केली पाहिजे. अशा सेवाबुध्दीनें जेव्हां आपण व्यवहार करूं इच्छितों तेव्हां तो जगांतील लोकांशी कसा करूं शकूं? माझ्या गांवच्या लोकांची सेवा करणें मला सोपे आहे, सहज आहे. तो माझी गरज भागवील, मी त्याची. सेवावृत्तीचें अर्थकारण असेल तर यांत्रिक उत्पादनानें ते कसें शक्य? तेथें ग्रामोद्योगच हवा. संपत्तीचें विकेंद्रीकरण आपोआपच होईल.

« PreviousChapter ListNext »