Bookstruck

महात्मा गांधींचें दर्शन 57

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

साधनें तींच. बाण जाऊन बंदूक आली. बंदूक जाऊन तोफ आली-परंतु साधनें हिंसेचींच. हिंसेनेंच माणूस माणसास लुबाडतो. हिंसेनेंच साम्राज्यें, हिंसेनेंच समाजवाद, हिंसेनेंच राज्यसंस्थाहि दूर करायची. साध्यें नाना प्रकारचीं. परंतु साधन हिंसेसेंच. हा विरोध आहे. साध्यें उत्तरोत्तर थोर असतील तर साधनेंहि थोर वापरा. मार्ग शुध्द न घेतां, अंतरंग शुध्द न करतां, साधनें शुध्द न वापरतां प्राप्त झालेली ध्येयें मला नकोत, असें महात्माजी म्हणतील. पूर्वींच्याच हिंसात्मक मार्गानें जरी सत्ययुगाची प्राप्ति होत असली तरी ती मला नको. ती प्राप्ति नसतेच. तो भ्रम असतो. पाश्चिमात्यांनी हा भ्रम निर्माण केला आहे. हिंसेनें सारें मिळतें असें त्यांना वाटतें. या मार्गानें उच्च ध्येयें कदापि प्राप्त होणार नाहींत. ध्येय उच्च असेल तर साधनेंहि तितकींच उच्च वापरा. तें साधन म्हणजे माझी आत्मशक्ति. अंतःकरणाची सुधारणा आधी सर्वांनी करूं या. ही सुधारणा माझी मीच करायची असते. म्हणून महात्मा गांधींच्या मार्गांत स्वतःची सुधारणा आधीं असते, मग जगाच्या सुधारणेवर भर असतो. अंतरंग सुधारणेपासून प्रारंभ करून मग जगाच्या सुधारकणेकडे वळायचें. परंतु सर्वांनी अंतःकरणाची सुधारणा करावी असें म्हणून भागत नाहीं. त्यांना तसें करतां यावें म्हणून साथ साथ दुसर्‍याहि गोष्टी आणायला हव्यात. महात्मा गांधी एकदां म्हणाले,''लोकांना पोटभर जेवायला जोपर्यंत मी देऊं शकत नाहीं, तोंवर त्यांना रामनाम घ्यायला तरी कसें सांगूं?'' अंतरंगाच्या सुधारणेबरोबर बाह्यांगाचीहि सुधारणा करीत राहिलें पाहिजे. एकीकडे मन मोठें नि निर्मळ करीत जावयाचें, तर लगेच तिकडे त्याचा प्रतिध्वनि राजकीय नि आर्थिक परिस्थिति शुध्द करण्याच्या रूपानें उमटला पाहिजे. आंतरिक सुधारणेंतूनच बाह्य क्रियेचीहि सुधारणा.

प्राचीनकाळी आपल्याकडे याचाहि जणूं श्रमविभाग केला गेला. काहींनीं केवळ आंतरिक सुधारणेवरच भर दिला. समाजधारणेचा कोणताहि व्यवसाय सोडण्याची वास्तविक जरूर नाहीं. गीतेची अशी शिकवण आहे. महात्मा गांधी हीच देत आहेत. भगवान् बुध्द आले तरी त्यांनाहि मी नम्रपणें चरखा चालवा असें सांगेन असें एकदां ते म्हणाले. पूर्वी शेतींत हिंसा होते म्हणून कोणी शेतीच सोडली. ब्राह्मणांनी म्हणे शेती करूं नये. हें अयोग्य आहे. असें करण्याची जरूरी नाहीं, एवढेंच नव्हे तर चूक आहे. वेदांतील ऋषि सांगतो -

''कृषिमित् कृषस्व''

'अरे, शेतीच कर' असें वेद सांगतो. शेतीचें काम, भंग्याचें काम हीं दोन्ही कामें महात्माजींना फार आवडतात. सेवेचें कोणतेंच कर्म अपवित्र नाहीं. शेतीचें काम नि स्वच्छतेचें काम - ही कामें करणार्‍यांना अत्यन्त मान द्या असें गांधीजी सांगतात. शेतींत हिंसा होत असेल तर ती कमी कशी करतां येईल त्याचा शोध करा. शेतीचाच त्याग नका करूं.

« PreviousChapter ListNext »