Bookstruck

श्याम 11

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

२. खोटीखोटी झोप

माझे डोळे चांगले बरे झाले. पावसाळा असल्यामुळे बोटी बंद होत्या म्हणून बोटी सुरु होईपर्यंत मी मामांकडे मुंबईस होतो. तेथेच मी घरी लिहू वाचू लागलो. मामा मला लहान लहान पुस्तके आणून देत. वाचनाचा मला लहानपणापासून खूप नाद होता. मामांचे एक मित्र होते. त्यांचे नाव होते माधवराव. ते उंच होते. गौरवर्ण होते. ते नेहमी हसतमुख असत. त्यांना रागावलेले मी कधीच पाहिले नव्हते. ते अत्यंत प्रेमळ होते. त्यांच्याजवळ वाचावयास मला आवडत असे. त्यांच्याजवळ वाचीत बसण्याचा मला कधीही कंटाळा येत नसे. सूर्यफुलाला सूर्याकडे पाहाण्याचा का कधी कंटाळा येतो ? चंद्राला पाहून उचंबळण्याचा समुद्राला का शीण होतो ? गाईजवळ उभे राहाण्याचा वासराला का त्रास होतो ?

माधवराव चित्रांची, गोष्टींची, चांगली पुस्तके मला आणून देत. ते मला जवळ घेत व मला शिकवीत. कधी नवनीतातील कविता ते माझ्याजवळून वाचून घेत. ते मध्येच माझ्या केसांवरुन हात फिरवीत, पाठीवर प्रेमाने थोपटीत. माझे मन त्यांच्याजवळ फुलत असे.

परंतु माझे मामा रागीट होते मामांजवळ शिकावयास माझा जीव भीत असे. एखाद्या वेळेस ते मला शिकवू लागत. जरा काही चुकले तर ते चटकन अंगावर येत असत. उलटसुलट प्रश्न विचारुन ते गोंधळवीत. मी घाबरत असे. त्यांचे शिकवणे केव्हा एकदा संपते याची मी वाट पहात असे. ते प्रश्न विचारीत तिकडे माझे लक्षही नसे. त्यांच्या कठोर डोळयांकडे व राकट मुद्रेकडे पाहून मनातले उत्तर पळून जाई व मी काही तरी चुकीचे सांगे. शेवटी ते संतापत व म्हणत, 'मर जा काटर्या ! तुला काही अक्कल   नाही !'

मामांचे शिकवणे चुकविण्यासाठी मी प्रयत्न करीत असे. सकाळच्या वेळी मामांना फारसा वेळ होतच नसे परंतु रात्री मामा घरी आले म्हणजे निरनिराळे हिशेब वगैरे घालून ते मला सतावीत. रात्री मामा घरी येण्यापूर्वीच झोपावयाचे असे मी ठरविले. कारण माझे जेवण आधी होऊन जात असे.

मामांची यावयाची वेळ झाली की, मी अंथरुणात पांघरुण घेऊन पडत असे. झोपेचे सोंग घेत असे.

'का ग; श्याम झोपला वाटते ?' मामा मामीला विचारीत.

'जेवला व झोपला.' मामी म्हणे.

दिव्याच्या विरुध्द बाजूस मी माझे तोंड ठेवीत असे. तोंडावर अंधार असे. माझे तोंड मामांना दिसत नसे. त्यांचे बोलणे मला ऐकू येत असे.

« PreviousChapter ListNext »