Bookstruck

श्याम 20

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

पावसाळा संपला. शरदऋतू आला. आकाश प्रसन्न झाले. दसरा गेला. दिवाळी जवळ आली. कोकणच्या बोटी सुरु झाल्या. दिवाळीसाठी लोक घरी जाऊ लागले. मामा मला घरी पोचविणार होते. आमची तयारी होऊ लागली.

'मामा ! अहंमदला माझा नमस्कार सांगा. त्याला म्हणा की, श्याम आता जाणार आहे कोकणात.' सांगा हं मामा !' मी म्हटले.

आमचा जाण्याचा दिवस आला. मी माझी पुस्तके घेतली. अहंमदने दिलेली चित्रे घेतली. माधवरावांनी दिलेले चित्राचे पुस्तक घेतले. मामांनी घेतलेले बूट पायात घातले. मी सर्वांना नमस्कार केला. चंपूताईला 'जातो' म्हणून सांगितले. चंपूताई रडू लागली.

व्हिक्टोरियात बसून आम्ही बोटीच्या धक्क्यावर आलो. बोटीत कोण गर्दी ! फटाके, बेणबाजे, खेळणी विकणारांचीही कोण गडबड. मामांनी मला एक बेणबाजा घेऊन दिला. मी बेणबाजा वाजवीत बसलो. बोट सुरु झाली. बोटीतील पोहोचविणारे परत गेले. विकणारे परत गेले. बोट ओरडली. मी मामांना घट्ट  मिठी मारली.

मी बोटीत हिंडत होतो. संत्र्याची साल दो-यास बांधून ती पाण्यात मी सोडली. तिला पाण्यात मी नाचवीत होतो.

'श्याम ! जरा पड.' मामा म्हणाले.

'मी नाही झोपत. मी लाटांची मौज पहातो.' मी म्हटले.

'फार खोल वाकू नकोस.' ते म्हणाले.

'नाही.' मी म्हटले.

मामा झोपले होते. मी पुस्तक पहात होतो. अहमदने दिलेली चित्रे पहात होतो. ती चित्रे मी पुन्हा नीट ठेवून दिली.

मामा उठले. ते म्हणाले, 'श्याम ! थोडा फराळ करु - ये.'

आम्ही फराळ करु लागलो. मला एकदम अहंमदची चर्चा डोळयांसमोर आली.

'मामा तुम्ही अहंमदला माझा नमस्कार सांगितला ?' मी एकदम विचारले.
'होय.' मामा म्हणाले.

'मग तो काय म्हणाला ?' मी उत्सुकतेने विचारले.

त्या दिवशी काही बोलला नाही, परंतु दुस-या दिवशी त्याने एक रुमाल आणून दिला व म्हणाला, 'हा श्यामला द्या. माझा सलाम सांगा.' मामा म्हणाले.

« PreviousChapter ListNext »