Bookstruck

श्याम 44

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

मला भीती वाटू लागली. हा गाडीवान मला आणखी कोठे घेऊन तर नाही जाणार ? माझ्याजवळ पैसे नव्हते. ना अंगाखांद्यावर दागिना. हातात कडी-तोडे व कानात बाळी नव्हती. त्याचा या वेळेस खरा आनंद झाला. गाडीवानाने जोराने चाबूक मारिला. गाडी भरभर धावू लागली. थोडया वेळात म्हारबावडी. माझ्याजवळ बारा आणे नव्हते. गाडीवान बारा आणे मागू लागला. मी माझ्याजवळचे सारे पैसे त्याला दिले व म्हटले, 'तू येथे थांब. मी तुला उरलेले पैसे आणून देतो.' मी गाडीतून सामान घेऊ लागलो. गाडीवान म्हणाला, 'सामान राहू दे. तुम्ही गेलेत तर परत कशावरुन याल ?' मी बरे म्हटले.

वळकटी गाडीतच ठेवून मी मामा राहात त्या चाळीत गेलो. मामा, दुस-या मजल्यावर रहात होते. मामा जेवून वर्तमानपत्र वाचीत होते. आत शिरण्याचे मला धैर्य होईना. गाडीवान तिकडे पळून तर नाही जाणार असेही मनात आले. मी चोरासारखा बाहेर उभा राहिलो. इतक्यात शेजारच्या खोलीतील शास्त्रबोवा पोटावर हात फिरवीत बाहेर आले. त्यांनी विचारले, 'कोण आहे येथे उभे ?' तो प्रश्न ऐकून मामा बाहेर आले. मी हळून म्हटले, 'मी आहे श्याम !'

मामा आश्चर्यचकित झाले. 'तू एकटासा आलास ? मामा का आले आहेत ? तुझे सामान कोठे आहे ?' त्यांनी विचारले. मी सांगितले, 'बाहेर विहिरीजवळ गाडीवान आहे. त्याचे आणखी तीन आणे द्यावयाचे आहेत.' मामांनी तीन आणे नेऊन दिले व वळकटी घेऊन आले.

मामांनी माझी फेरतपासणी चालविली. शेवटी मी त्यांना सांगितले की, 'मी पळून आलो आहे.' मी असे सांगतो इतक्यात तार आली. पुण्याहून ती तार आली होती. माझ्या बद्दल ती तार होती. धाकटया मामांना माझा राग आला. त्यांनी माझ्या दोन थोबाडीत मारल्या. परंतु धाकटया मामीने घरात नेले. तिने माझे डोळे पुसले. उरलेली भात-भाकर जेवू घातली. मामा रागाने बोलत होते. शेवटी अंथरुण घालून मी पडलो. रडता रडता झोपेने मला केव्हा कवटाळले व स्वत:च्या कुशीत घेतले ते समजलेही नाही.

« PreviousChapter ListNext »