Bookstruck

श्याम 59

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

"श्याम ! खोटे कशाला सांगू ? मी पितो कधी कधी दारु. मागे लोकमान्यांचे लोक पिकिटिंग करीत तेव्हा सोडली होती; परंतु पुन्हा लागली. श्याम, दारु पिणारे सारेच वाईट असतात असे नाही. लोकांचा चहा सुटत नाही. मग दारु कशी सुटेल ? माझी दारु सुटत नाही.' तो म्हणाला.

"मी माझ्या रामाला सांगेन शिवरामची दारु सुटव.' मी म्हटले.

"सांग तुझ्या रामाला, तुझे तो ऐकेल. लहान मुलांचे देव ऐकतो, असे म्हणतात. मी आता जातो हं श्याम. रडत जाऊ नको.' असे म्हणून शिवराम गेला.

तो दृष्टीआड होईपर्यंत त्याच्याकडे मी पहात होतो. मी तो चेंडू पुन: :पुन्हा पहात होतो. परंतु तो चेंडू मला किती दिवस पुरला असता ? माझ्या डोळयांतून पाणी येऊ नये म्हणून शिवराम प्रार्थनाही करी. ती प्रार्थनाच मला जन्मोजन्मी पुरेल. हृदयातील सद्भाव व सत्प्रेम हीच आपली शिदोरी. मंगल सदिच्छा व मंगल आशीर्वाद हीच आपली साधने. बाहेरचे तुकडे व चिंध्या किती दिवस पुरणार ?

शिवराम माझ्यासाठी प्रार्थना करी व मीही त्याच्यासाठी करु लागलो. शिवरामची दारु सुटली का ? मला काय माहीत ? शिवरामची आठवण येऊन मी रडलो आहे. एक साधा गवंडी. ना शिकलेला, ना पढलेला. ना कोठल्या आश्रमातला, ना संघातला ! परंतु कसे त्याचे मन, किती उदात्त जीवन ! स्वदेशीची कशी तळमळ, लोकमान्यांबद्दल किती भक्ती ! लहान मुलांच्या अश्रूंबद्दल केवढी दया. ! दिलेल्या वचनाबद्दल किती निष्ठा !

धन्य तो दारु पिणारा परंतु मूळ थोर हृदयाचा पुण्यवान कष्टमूर्ती मजूर शिवराम ! ज्या पुण्यपुरीत असे मजूर जन्मतात त्या पुण्यपुरीलाही माझे शतश: प्रणाम.

« PreviousChapter ListNext »