Bookstruck

श्याम 79

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

गोवारी तुच्छ, तसेच म्हणे नांग-याही तुच्छ. का रे बाबा नांग-या तुच्छ ? या भूमातेची सेवा करुन जगाला पोसण्यासाठी धान्य निर्माण करणारा तो कष्टमूर्ती शेतकरी. तो का तुच्छ ? जो थंडी पहात नाही. ऊनवारा, पाऊसपाणी पहात नाही, पहाट पहात नाही, दुपार पहात नाही, रात्र पहात नाही, चिखल पहात नाही, काटे पहात नाही, खळयात पीक असले तर रात्री खळयातच आगटी पेटवून झोपतो, नको पांघरायला, नको आंथरायला. पुन्हा इतके सारे करुन किती नम्र, किती आदरातिथ्य करणारा. त्याच्या झोपडीजवळ जा, घोंगडी पसरील; 'कणीस भाजू का, शेंगा भाजू का, ओंब्या आणू का ?' असे मन:पूर्वक विचारील. जो कोंबडयाबरोबर उठतो; सूर्य वर येताच आपल्या कर्ममग्न हातांनीच त्याला वंदन करतो; नवीन नवीन झाडे लावतो; त्यांची निगा राखतो; बैलांना चारा आधी घालतो मग स्वत: जेवायला जातो; गुराढोरांना पाणी पाजतो मग स्वत: पाणी पितो. कसे त्याचे गाईगुरांवर, झाडामाडांवर, शेताभातांवर, मुलाबाळांवर प्रेम ! असा तो शेतकरी, असा तो नांग-या- तो का तुच्छ, हीन ? मग बाबा जगात वंदनीय तरी कोण, पूज्य तरी कोण ?

इंग्लंड देशात कार्लाईल म्हणून एक प्रख्यात लेखक झाला. त्याने एके ठिकाणी लिहिले आहे, 'जगात दोनच माणसे वंदनीय व गौरवार्ह आहेत. एक जगाला काबाडकष्ट करुन धान्याची भाकर देणारा कष्टाळू शेतकरी व दुसरा रात्रंदिवस चिंतन करुन मनाला पुष्ट करणारा, विचारांची हितमंगल भाकर देणारा तत्त्वज्ञ.'

गौतम बुध्द एकदा एका जमीनदाराच्या घरी भिक्षा मागावयास गेले. तो जमीनदार म्हणाला, 'भीक रे का मागतोस ? उद्योग का करीत नाहीस ? शेतीभाती का करीत नाहीस ?' भगवान बुध्द म्हणाले, 'मी शेतकरीच आहे, मीही शेती करतो, रात्रंदिवस कष्ट करतो, मेहनत-मशागत करतो व धान्य पिकवितो.'

जमीनदार-कोठे आहे तुझी शेती ? कोठे आहेत तुझे बैल ? कोणत्या नांगराने नांगरतोस ? कोठे आहे तुझे धान्याचे कोठार ?

भगवान बुध्द:- माझ्या हृदयात मी शेती करतो. विवेकाच्या नांगराने नांगरतो. संयम व वैराग हे माझे बैल. प्रेम, ज्ञान, अहिंसा यांचे बी मी पेरतो. स्वार्थी वासनांची तणे मी काढून टाकतो. माझे पीक भरपूर येते. रात्रंदिवस काळजी वाहतो. पश्चात्तापाचे पाणी देतो. भरदार कणसे येतात. ते प्रेमाचे, विचारांचे धान्य मी जगाला वाटून देत असतो. माझी कोठारे देण्यासाठी भरलेली असतात. दिल्याने रिती न होता उलट भरतात, अशी ही माझी देवाघरची शेती आहे.

भगवान बुध्दाप्रमाणे मानवी समाजाला चिरकाल पुरुन उरणारी दिव्य विचारांची भाकर देणारा महात्मा शेकडो वर्षांत भाग्याने एकदाच जन्मत असतो. ती भाकर देण्यासाठी भगवान बुध्दांना किती कष्ट पडले. किती तपेच्या तपे तपश्चर्येत, चिंतनात दवडावी लागली ! भगवान बुध्दांप्रमाणे विचाराची भाकर देणारे आपणा सर्वांना होता येणार नाही. परंतु भूमातेची सेवा करुन मोत्याच्यासारख्या ज्वारीची भाकर आपण जगाला देऊ शकू.

« PreviousChapter ListNext »