Bookstruck

श्याम 108

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

आम्ही खाली गेलो. गंगूने दिवा लागला. आम्ही दिव्याला नमस्कार केला. प्रकाशाहून जगात पूज्यतर असे दुसरे काय ? प्राचीन ऋषींनी एकाच वस्तूसाठी उत्कृष्टपणे प्रार्थना केली. व ती वस्तू म्हणजे प्रकाश.

गंगूने पुढीलप्रमाणे गोड गाणे म्हटले.

रे मना, ऐक सज्जना, भुलु नको पुन्हा, मुक्त होशील  ।
प्रभुनाम जरी घेशील  । । रे मना. ।।

तनुचा, रे नसे भरवसा, बुडबुडा जसा, तसा हा देह  ।
तिळमात्र नसे संदेह
राहती, जगाते जागी, शेतबाग बगी, राहता वाडा ।
पडशील स्मशानी उघडा  ।।

म्हणुनिया, विषय धरि दूर, हरे हुरहुर, भक्तिचा सूर, अंतरी घुमवी  ।
प्रभुपदी वृत्तिला रमवी  ।।

बोधास, करिति विरोधास, कामक्रोधांस, दूर त्या पळवी  ।
प्रभुपदी वृत्तिला रमवी  ।।

श्रीराम, सुखाचे धाम, भक्तिविश्राम, स्मरे हृदयात  ।
संपेल मोहमय रात्र  ।।

भवसिंधु, होई एक बिंदु, भेटे गोविंदु, सुखे तरशील
मोक्षाचे मळे पिकतील  ।। रे मना. ।।

गाणे संपल्यावर मी म्हटले, 'गंगू ! किती गोड आहे गाणे नाही ?'

गंगू म्हणाली, 'मी म्हटलेले तुला सारे आवडते.'

मी म्हटले, 'माझ्या रामाचे नाव ज्यात आहे ते मला सारे आवडते. मग ते रामाचे नाव गंगू उच्चारो की रंगू उच्चारो.'

"श्याम ! जेवायला चल.' जगन्नाथने हाक मारली.

मी एका रविवारी गंगूजवळ गोष्टी करीत बसलो होतो. ती मला उखाणे घालीत होती व त्या उखाण्यांची उत्तरे देता आली नाही की ती मला चिडवीक होती.

गंगूने विचारले, 'नाक आहे पण वास नाही असे कोण ?'

मी म्हटले, 'पडसे आलेला मनुष्य.'

गंगू म्हणाली, 'इश्श ! हे रे काय ? नीट उत्तर दे. नाही तर हरलो असे म्हण.'

मी म्हटले, 'हरलो बुवा आपण !'

गंगू म्हणाली, 'कप'

मी म्हटले, 'आता दुसरा सांग.'

गंगू म्हणाली, 'ऐक, कान आहेत पण ऐकू येत नाही; तर ते कोण ?'

मी म्हटले, 'गंगू.'

« PreviousChapter ListNext »