Bookstruck

श्याम 112

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

मी म्हटले, 'परंतु चौथे कोण ?'

गंगू म्हणाली, 'आई हात चालवील.'

मी म्हटले, 'पण मला अभ्यास आहे.'

गंगू म्हणाली, 'तू लबाड आहेस. मी बोलावले म्हणजे अभ्यास असतो नाही कारे ? मी आता गेले, म्हणजे खूप कर हो अभ्यास. कधी नाही पुन्हा गंगू येणार त्रास द्यायला !'

मी म्हटले, 'पुन्हा येणार नाहीस ?'

गंगू म्हणाली 'भाऊची बदली येथून झाली म्हणजे मी येथे कशाला येईन ?'

मी म्हटले, 'श्याम तरी कशाला राहील ?'

गंगू म्हणाली 'तू कोठे जाशील ?'

मी म्हटले, 'जाईल पक्षी कोठेतरी उडून !'

गंगू म्हणाली, 'मग ये हो रात्री खेळायला. आमच्याकडेच नीज.'

मी रात्री गंगूकडे खेळायला गेलो. बराच वेळ आम्ही खेळत होतो. त्या रात्री मला खूपच दान पडले.

गंगू म्हणाली, 'श्याम ! बघ कसे भराभर दान पडते आहे. उगीच कल्पना करुन घेतोस.'

मी म्हटले, 'तुझा हातगुण. मी तुझ्या बाजूने आहे म्हणून पडते आहे. ही सारी तुझी पुण्याई. तुझे नशीब थोर आहे.'

गंगू म्हणाली, 'परंतु मला कोठे पडते आहे ?'

मी म्हटले, 'तू आपले नशीब मला दिले आहेस व माझे दुर्दैव तू घेतले आहेस. मला रडू येऊ नये म्हणून तुझा हात मला दिलास, माझा हात तू घेतलास. म्हणून तुझ्या हाताने दान पडत नाही आणि माझ्या हाताने पडत आहे.'

दिगंबराची आई म्हणाली, 'पुरे आता खेळ. श्यामला जांभया येऊ लागल्या. श्याम ! तुझे अंथरुण दारात ना ?'
मी म्हटले, 'होय; परंतु तुम्ही मला झोप लागल्यावर खाली ओढून घ्याल. तुम्ही दारे का लावता ? नेहमी दारे उघडी ठेवावी. कोंडवाडे कशाला ? मला वारा फार आवडतो.'

गंगू म्हणाली 'तू आहेसच वा-याप्रमाणे चंचल. लहानपणापासून तीनचारदा पळालास. वा-याप्रमाणे इकडे तिकडे पळणार.'

मी म्हटले, 'माझे मामा मला पळपुटा बाजीराव म्हणतात. मग घाल की येथे अंथरुण ! दार लावू नका हां गंगूच्या आई.'

मी माझे अंथरुण घातले व उंबरठयावर डोके ठेविले.

गंगू म्हणाली, 'श्याम ? उशाला काय ? आज पुस्तकांची पिशवी कोठे आहे ?'

« PreviousChapter ListNext »