Bookstruck

श्याम 115

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

गंगू म्हणाली, 'अरे मी तरी काय दिले ? माझे असे काय दिले ? लोकांकडचे पपनस आणून दिले. उशी केली तर तिच्या चिंध्या तूच आणून दिल्यास ! गंगूही गरीब आहे. ती एका बेलिफाची बहीण आहे. एके  दिवशी माझ्या मनात आले की, मुन्सफांकडे करावी चोरी व श्यामला पैसे आणून द्यावेत. श्यामला फीसाठी होतील. परंतु धीर होईना.'

मी म्हटले, 'गंगू ! तू वेडीस आहेस !'

गंगू म्हणाली, 'वेडेच राहणे चांगले. तू सुध्दा वेडाच आहेस.'

मी म्हटले, 'मग मला काही तरी देण्यासाठी पुन्हा चोरी कर. आण पपनसची फोड लांबवून. पैसे चोरण्यापेक्षा पपनसाची फोड लपवून आणलीस तरी चालेल.'

गंगू म्हणाली, 'तुला रामाचे नाव आवडते ना ? ज्यात राम आहे ते गाणे तुला आवडते. ज्यात राम आहे ते चित्र तुला आवडते, ज्यात राम आहे ते फळसुध्दा तुला आवडत असेल. नाही ?'


मी म्हटले, 'होय. रामफळ मला फारच आवडते.'

गंगू म्हणाली, 'मग तेच मी तुला देणार आहे. श्यामला राम द्यावा व मग म्हटले येथून जावे.'

मी विचारले, 'तू कोठून आणलेस ?'

गंगू म्हणाली, 'तुझ्या आत्याच्या झाडावरचे.'

मी विचारले, 'कोणी काढून दिले ?'

गंगू म्हणाली, 'मीच चढून ते काढले.'

मी विचारले, 'ते का पिकले होते ?'

गंगू म्हणाली, 'ते मी पिकविले आहे. तांदळात घालून ठेवले होते. छान पिकले आहे. उद्या देऊ का आजच देऊ ?'

मी दु:खाने म्हटले, 'गंगू ! ही चोरी झाली.'

गंगू म्हणाली, 'कसली रे चोरी ! इतकी झाडे आहेत. त्यावरचे एक घेतले तर ती का चोरी ? पाखरे वर बसून खातात त्यांना का देव चोर म्हणेल ?'

मी म्हटले, 'आपण माणसे आहोत. देवाने आपणास बुध्दी दिली आहे. आपण असे वागून कसे चालेल ?'

गंगू म्हणाली, 'मी आहे वेडी ! मी पाखरुच आहे ! पाखरु होऊन झाडावर बसून सुंदर फळे मला चाखू दे व गोड आवाज काढू दे. मला नको ती बुध्दी ! जेथे तेथे डांबून ठेवणारी बुध्दी काय कामाची ? श्याम ! तू सुध्दा मागे एकदा म्हणाला होतास की, मला पक्षी होणे आवडते म्हणून. आठवते का ? मीही पक्षी होऊन झाडावर चढले आणले फळ तोडून. रामाच्या नावाचे फळ तोडून आणले. श्याम ! घेशील ना ते ?'

« PreviousChapter ListNext »